बडोदा (गुजरात) – जगभरातील अचंबित करणाऱ्या घटनांबाबत आपण वाचत आणि ऐकत असतो. त्यात भारताचा क्रमांकही वरच्या स्थानी आहे. आता या अचंबित करणाऱ्या घटनांमध्ये काही मूर्खपणाच्याही असतात हा भाग वेगळा. अलीकडेच गुजरातमधील एका पोलीस स्टेशनने भूतांविरुद्ध तक्रार दाखल करून त्याची प्रचिती दिली आहे.
पंचमहल पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी दोन भूतांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पंचमहल जिल्ह्याच्या जंबूघोडा पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने ही तक्रार केली. तो शेतात काम करीत असताना भूतांच्या गँगने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असे त्याचे म्हणणे होते. त्यानंतर तो शेतातून पळाला आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये आला. जीव वाचविण्याची विनंती त्याने पोलीसांना केली. मुख्य म्हणजे त्याला धीर देऊन शांत करण्याचे काम पोलिसांनी करायला हवे होते. पण, त्याची तक्रार स्वीकारून पोलिसांनी आपल्या डायरीत नोंदही करून घेतली. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यामुळे तक्रार दाखल करून घेतली, असा युक्तिवादही या पोलिसांनी केला.
‘तो वेडा आहे’
या घटनेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी तक्रारकर्त्याच्या कुटुंबियांना फोन केला. पण पोलिसांचे एेकून घेत त्याच्या कुटुंबातील लोकांनी तो वेडा असून त्याचा उपचार सुरू असल्याचे सांगितले. शेतातून पळाल्यावर तो पोलीस स्टेशनला आला, कारण त्याला असे वाटत असते की भूत पोलिसांना घाबरतात. दोन तास एका माणसाच्या मागे घालविल्यानंतर पोलिसांना कळले की हा मनोरुग्ण आहे. त्यामुळे त्यांचा संताप झाला. पण पोलिसांनी आपल्या गाडीत त्याला घरी सोडून दिले आणि त्याचा उपचार नियमीत करण्याचा सल्लाही घरच्यांना दिला.