विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
साधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली तरीही पुढचे पाच वर्ष सरकारी पैश्यानेच चहा–नाश्ता–जेवण करणाऱ्या पुढाऱ्यांच्या देशात आपण राहतोय. आणि दुसरीकडे सरकारी पैश्याने कुटुंबासोबत चहा–नाश्ता केला म्हणून चक्क एका देशाच्या पंतप्रधानावरच कारवाईचे संकट आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एक फोटो खूप व्हायरल होतोय. या छायाचित्रात अमेरिकेचे तीन माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यावर तिघेही अत्यंत सामान्य माणसासारखे आयुष्य जगत आहेत, असे कॅप्शन या फोटोखाली असते.
भारतात सरकारी पैश्याने विदेशवारी आणि मौज करणाऱ्या पुढाऱ्यांना टोमणा मारण्यासाठीच हे छायाचित्र व्हायरल होतेय. पण फिनलँडची कहाणी जरा वेगळी आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी सरकारी निवासस्थानी आपल्या कुटुंबासोबत चहा–नाश्ता केला. सरकारी पैश्यातून त्यांनी नाश्ता केल्यावरून वाद उद्भवला आहे. करदात्यांच्या पैश्यांचा असा दुरुपयोग करता येत नाही, त्यामुळे फिनलँडच्या पोलिसांनी चौकशीचे संकेत दिले आहेत.










