नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरुळ येथील द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानदीप गुरूकुल आश्रमात विद्यार्थीनीवर बलात्कार करणा-या संशयित संचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२ रा. मानेनगर, म्हसरुळ) यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत (दि.३०) पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आली आहे.
बलात्कारानंतर या वसतीगृहातील काही मुलींनीही लैंगिक शोषण झाल्याबाबतचा जबाब नोंदविल्याने त्याच्यावर कडक कारवाईचा फास आवळला जाणार आहे. पीडित मुलींच्या तक्रारीनुसार त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, या वसतिगृहात राहणा-या मुलांना घरी पाठविण्यात आले असून मुलींना शासकीय आधारआश्रमात ठेवण्यात आले आहे. या सर्व मुलींचे जवाब नोंदविण्यात येत आहे. यातील काही मुलींनी लैंगिक शोषणाबाबत जबाब नोंदविले आहेत. त्यातील काही प्रकरणे जुनी असून आत्ताची आहेत. या घटनेचे गांभीर्य पाहता संशयिताला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
Nashik Crime Molestation Rape Dyandeep Ashram Police Girl Complaint