पुणे – नाशिक शहरातील पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाने पुण्यातील एका हवालदाराच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची बाब समोर आली आहे. लग्नास नकार देत अश्लिल फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही झाला आहे. तशी फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी फौजदार पुत्रावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलिमा पवार यांनी सांगितले की, सदर घटनेतील संशयित आरोपी हा नाशिकमधील पोलिस उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. केतन शेळके असे त्याचे नाव असून तो इंटेरिअर डिझायनर आहे. त्याची आणि फिर्यादी मुलीची ऑक्टोबर २०२० मध्ये एका विवाहबंधन वेबसाइटद्वारे भेट झाली. सदर मुलगी पुण्यातील असून तिचे वडिल पोलिस हवालदार आहेत. वेबसाईटद्वारे ओळख वाढल्याने शेळके याने तिला लग्नाचा प्रस्ताव पाठविला. त्यानंतर दोघांमध्ये फोनद्वारे गप्पा सुरू झाल्या. काही दिवसांनी दोघांनीही आपले सोशल मिडिया अकाऊंट एकमेकाला शेअर केले. त्यामुळे ते सतत फेसबुकवर गप्पा मारत आणि त्यांच्या संपर्क तपशीलांची देवाणघेवाण करत होते.
फिर्यादीनुसार, शेळके याने लग्नाचा प्रस्ताव पाठविल्यानंतर दुसर्याच दिवशी तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला. दोघांची भेट झाल्यावर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून शिवाजीनगर येथील लॉजमध्ये नेले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लग्नाची बोलणी करण्यासाठी त्याने तिला नाशिकला बोलवे. त्यावेळीही त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाईल कॅमेर्यात तिची अश्लील छायाचित्रे काढली. काही दिवसांनी त्याने लग्नाबद्दल नकार दिला. मुलीच्या आईनेही त्याच्याशी संवाद साधला पण त्याने शिवीगाळ केली. धमकावणे आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरू असतानाच शेळके याने दुसर्या मुलीशी लग्न केले. त्याची दखल घेत मुलीने फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित शेळके यास अटक करण्यात आली असून पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.