मुरादाबाद (उत्तर प्रदेश) – येथे विमा पॉलिसी करण्याच्या आडून सेक्स रॅकेट चालविणार्या टोळीला पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात दोन महिलांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी केल्यानंतर कांशीराम नगर येथील एका घरातून बंगालच्या दोन युवतींची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संशयित विमा पॉलिसी करणार्या ग्राहकांना युवती पुरवत होते. या टोळीच्या इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सीओ इंदू सिद्धार्थ म्हणाले, की काही महिला आणि पुरुष शहरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र प्रताप सिंह यांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास दीन दयालनगर येथील एका घरात सापळा रचला. तेथून पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी युवकाची चौकशी केल्यानंतर इतर आरोपींची माहिती मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी मझोला पोलिस ठाणे हद्दीत बुद्धी विहार येथील एका घराजवळ सापळा रचला. तेथून दोन महिला आणि दोन युवकांना ताब्यात घेतले. त्याशिवाय कांशीराम नगर येथून दोन युवतींची सुटका केली. दोन्ही युवती पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील रहिवासी आहेत. दिल्लीत त्या शिक्षण घेत होत्या.
सेस्क रॅकेट चालविण्यात दोन महिला आणि तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी महिला उत्तराखंडमधील काशीपूर आणि दुसरी महिला अमरोहा येथील रहिवासी आहे. त्या मुरादाबादमध्ये राहात होत्या. तसेच राहुल दास, बाबू ऊर्फ धीरज आणि राजू ऊर्फ नीरज यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने राहात होते.
दोन्ही महिलासह राहुल दास आणि बाबू ऊर्फ धीरज हे आरोपी खासगी विमा पॉलिसी कंपनीत पॉलिसी करून देत होते. विमा पॉलिसीची विक्री करताना ते देहविक्रय सेवा उपलब्ध करून देत होते. या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांना सेक्सवर्धक गोळ्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड आणि ओळखपत्रासह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.