इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशा पोलिस दलातील हवालदाराकडे बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा झाला आहे. त्याने आपल्या तीन मजल्याच्या घराच्या छतावर स्वीमिंग पूल बनवून ठेवला आहे. देखरेख विभागाच्या पथकाने छापेमारी केल्यावर आरोपी जवान घटनास्थळावरून फारारी झाला. ही घटना मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा शहरातील आहे.
देखरेख विभागाला सूचना मिळाली की, या हवालदाराने अज्ञात स्त्रोतांकडून बेहिशेबी मालमत्ता जमवली आहे. बारीपाडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिरेंद्र सेनापती म्हणाले, की याच पोलिस ठाण्यातील हवालदार निहार रंजन दंडपतच्या मालमत्तेवर छापेमारी करण्यासाठी दक्षता विभागाचे पथक पोहोचले, तेव्हा तो घराच्या छतावरून उडी मारून फरारी झाला.
दक्षता पथकाच्या अधिकार्यांच्या ७ पथकांनी हवालदाराच्या सात विविध ठिकाणांवर छापेमारी केली होती. या पथकामध्ये ९ डीएसपी, ५ इंस्पेक्टर आणि ५ असिस्टंट सब इंस्पेक्टर सहभागी झाले होते. हवालदाराचे सरकारी निवासस्थान, त्याचे खासगी निवासस्थान तसेच त्याच्या आई-वडिलांच्या घरासह एकूण ७ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीतून १.२७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा खुलासा झाल्याची माहिती दक्षता पथकाच्या अधिकार्यांनी दिली.
https://twitter.com/abhilasha_panda/status/1480877496585179137?s=20
या छापेमारीत तीन मजली इमारतीचा समावेश आहे. तसेच मयूरभंज जिल्ह्यात २ प्लॉट, दोन दुचाकी, कॉम्प्युटरशी संबंधित साहित्य, १३ लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिन्यांचा समावेश आहे. घरात छापेमारीदरम्यान तो गॅस एजन्सी चालवत असल्याचा खुलासाही झाला आहे. ही एजन्सी त्याची पत्नी पिंकी दंडपत हिच्या नावावर आहे.
गेल्यावर्षीही
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भुवनेश्वरमध्ये प्रसन्ना बहेरा या दुसर्या एका हवालदाराकडेसुद्धा बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा झाला होता. त्याने एका सरकारी निवासस्थानाचे टुमदार बंगल्यात रुपांतर केले होते. त्याने अवैधरित्या हे बांधकाम केले होते. यामध्ये त्याने ३ बेडरूम आणि इतर ५ खोल्या अशा ८ नव्या खोल्या तयार केल्या होत्या. त्याने भुवनेश्वरमध्ये १८००० स्क्वेअर फूट जमिनीवर चारचाकी वाहनांचे भव्य शोरून बांधले होते. त्याची किंमत अंदाजे ४ कोटी रुपये होती. अवैधरित्या बार चालवण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती.