नाशिक : उत्कृष्ट कामगिरीबाबत शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदारांचा सत्कार समारंभ पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि.२४) सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तिपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार केला.
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्विकारल्यानंतर नाशिक शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या गुन्हेगार, टोळी बनवून गुन्हे करणार्या गुन्हेगारांची दहशत संपुष्टात आणण्याचे जाहीर केले होते. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत उपनगर, नाशिकरोड, भद्रकाली, गंगापूर पोलीस ठाण्यांकडील चार गुन्ह्यांमधील ८१ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकने पाच महिन्यांत ५१ गुन्हे उघडकी आणत २६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच युनीट दोनने नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत विदेशी मद्याचे गोदाम लुटणार्या आरोपींना परजिल्ह्यात सापळा रचून अटक केली. तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी कोणताही पुरावा नसताना आरोपींना अटक केली. त्यानिमित उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, आनंदा वाघ, अजय शिंदे, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे आदी उपस्थित होते.