कानपूर (उत्तर प्रदेश) – पोलिस हा जनतेचा मित्र समजला जातो. सहाजिकच पोलिसांनी सर्वसामान्य जनतेची काळजी घ्यावी आणि गुन्हेगारांना शासन (शिक्षा) करावे, असा कायदा किंवा नियम आहे. परंतु काही वेळा पोलिसच गोरगरीब जनतेवर अत्याचार करताना दिसतात. अशा घटना देशभरातील अनेक राज्यात घडत असल्या तरी उत्तर प्रदेशात याचे प्रमाण जास्त दिसून येते, असे म्हटले जाते. सहाजिकच उत्तर प्रदेश पोलीस अनेकदा वादात सापडले आहेत. काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे विभागावर नेहमीच प्रश्न निर्माण होतात. नुकतेच असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले आहे. येथे पोलिसांचा क्रूर चेहरा जनतेला दिसला.
ओपीडीचे कुलूप उघडण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचलेल्या पोलिसांनी माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आपल्या निष्पाप मुलीला हातात धरून ठेवलेल्या एका कर्मचाऱ्यालाही पोलिसांनी लाठीमार केला. वडिलांनी मुलीला हाताशी धरून मुलीला मारू नका हो, असे ओरडत राहिले, पण निर्दयी इन्स्पेक्टर तिच्यावर लाठ्यांचा वर्षाव करत राहिला. एवढेच नाही तर त्या बापाच्या हातातून मुलगी हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला.
या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एसपींनी आता सीओला चौकशी करण्यास सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयात कर्मचारी नेते रजनीश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी अचानक ओपीडी बंद करून काही मागण्यांसाठी धरणे धरले. त्यानंतर या घटनेच्या माहितीवरून पोलीस अधिकारी विनोद मिश्रा पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.
कर्मचाऱ्यांना गेटवरून हटवत असताना रजनीश शुक्ला यांची वॉचमनशी बाचाबाची झाली, यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका कर्मचाऱ्याने आपल्या मुलीला आपल्या मांडीत धरले असता, एका पोलीस अधिकाऱ्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. एका पोलीसाने तर निर्दयीपणे त्या लहान मुलीला त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसपी केशव चौधरी यांनी सीओ यांना या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.