नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीस दलात कार्यरत असलेल्या जावयाने पत्नीसह सासू आणि सास-यावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता दोडी बुद्रुक येथे घडली. या हल्ल्यात जखमी सासरे निवृत्ती सांगळे यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला असून सासू शिला सांगळे आणि पत्नी पूजा उगलमुगले या दोघीजणी गंभीर जखमी असून त्यांच्या सिन्नर फाटा येथील साई केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर संशयित पोलीस जावई सुरज उगलमुगले रा. उपनगर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, सूरजने पत्नीवर एक-दोन नव्हे तब्बल सपासप १८ वार केले आहेत. त्यामुळे पत्नी गंभीर जखमी आहे.
मनमाड येथे पोलीस दलात कार्यरत असलेला संशयित सुरज आणि पत्नी पूजा यांच्यात कौटुंबिक वाद होते. या वादातून पूजा माहेरी निघून गेलेली होती. त्यांच्यातील वाद उपनगर पोलीस ठाण्यातही पोहोचलेला होता. शुकवारी रात्री सुरज हा त्याच्या साठीदारासोबत दोडी बुद्रुक येथे गेला आणि पत्नी पूजावर चाकूने सपासप वार केले. पुजाला वाचविण्यासाठी धावून आलेले शिला सांगळे आणि निवृत्ती सांगळे यांच्यावरही सुरज याने चाकूचे वार केले. तिघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडताच सुरजने घटनास्थळावरून पोबारा केला.तिघाही जखमीना प्रथम दोडी बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या कुटुंबीयांनी जखमीना शनिवारी खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना जखमी सासरे निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाल्याने रविवारी सकाळी दोडी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी सिन्नर फाटा येथे रुग्णालयात धाव घेतली.
या घटनेबद्दल श्रीधर सांगळे (मृत निवृत्ती सांगळे यांचे बंधू) यांनी पोलिसांना सविस्तर माहिती दिली. बघा, त्याचा हा व्हिडिओ
निष्काळजीपणा दाखविणारे उपनगर आणि वावी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची आणि संशयित सुरज उगलमुगले यास जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. संतप्त ग्रामस्थांनी आपल्या भावना अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्याकडे व्यक्त केल्या. त्यांनी जखमींचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांची बाजू ऐकून घेतली आणि आपल्या तक्रारीनुसार चौकशी करून दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
त्यानंतर मयत निवृत्ती सांगळे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. सायंकाळी साडेपाच वाजता निवृत्ती सांगळे यांच्या मृतदेहावर दोडी बुद्रुक येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जखमी सासू शीला सांगळे आणि पत्नी पूजा उगलमुगले मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. मृत निवृत्ती सांगळे यांचे बंधू श्रीधर सांगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी यावेळी या प्रकरणाशी संबधित पोलीस अधिका-यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आणि या घटनेस पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप केला. संशयित सुरज उगलमुगले याला तातडीने अटक करून त्याच्यावर कारवाईची मागणी केली.