इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भोंदूबाबांची भारतासह जगभरात काही कमी नाही. हे माथेफिरु भोंदूबाबा कधी काय करतील याचा नेम नाही. आताही अशाच एका भोंदूबाबाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. मात्र, ही घटना भारताची नाही तर थायलंडमधील आहे. हा भोंदूबाबा स्वतःला सर्वधर्मांचा जनक (पिता) समजत असे. तसेच, त्याच्या अनुयायांना तो त्याची विष्ठा आणि लघवी पिण्यास देत असे. धक्कादायक म्हणजे पोलिसांना त्याच्या आश्रमात तब्बल ११ मृतदेह पेटीत ठेवलेले आढळले आहेत.
थाडलंडच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या चायफुम येथे थवी नानारा नावाचा भोंदूबाबा राहत होता. त्याचे वय ७५ वर्षे आहे. या भोंदूबाबाबद्दल दावा करण्यात आला आहे की, हा भोंदूबाबा त्याच्या अनुयायांना त्याची लघवी आणि विष्टाही खायला द्यायचा. बाबाची विष्ठा खाणे आणि लघवी पिण्यामुळे सर्व रोगांपासून आपण दूर राहू अशी या अनुयायांची धारणा होती.
रिपोर्टनुसार, थवी नानारा याने अनेक भक्तांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासोबतच बाबाने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचेही समोर आले आहे. याशिवाय एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांत दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने सांगितले की, महिला या बाबाकडे गेली होती आणि परत आलीच नाही.
बाबाना त्यांच्या जंगलातील आश्रमातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बनावट बाबाला पोलीस अटक करत असताना बाबाच्या अनुयायांनी एकच गोंधळ घातला. अहवालानुसार, आश्रमातून जे मृतदेह बाहेर काढण्यात आले ते सर्व शवपेटीमध्ये होते. हा भोंदूबाबा स्वतःला सर्व धर्माचा जनक समजत असे, असा दावाही करण्यात येत आहे. सध्या या बाबाला अटक करण्यात आली आहे.
https://twitter.com/hurriyatpk1/status/1524332736076525568?s=20&t=EAbRZb4Uez4KI4KG6oLmyQ