मुझफ्फरपूर (बिहार) – लग्न म्हणजे पवित्र बंधन. परंतु या लग्नविधीलाच काही लोक काळीमा फासण्याचे काम करतात. स्त्री भृण हत्या, गर्भलिंग निदान, तसेच बालिका असो की तरुण मुलींना ठार मारणे, हुंडाबळी, मुलींचा अनेक कारणांनी मानसिक आणि शारीरिक छळ व आत्महत्या यासारख्या घटनांमुळे विवाह इच्छुक मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. असा प्रकार वाईट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील अनेक राज्यातील ही शोकांतिका आहे. विशेषतः उत्तर भारतातील बिहार, राजस्थान, हरियाणा यासारख्या राज्यांमध्ये मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक आहे. यातूनच तरुण मुली विकण्याचे अनैतिक व्यवसाय देखील सुरू झाले आहेत.
हरियाणामध्ये अशीच एक घटना घडली. एका तरुण मुलाचे लग्न जमत नव्हते, कारण त्याला विवाह इच्छुक मुलगीच मिळत नव्हती. अखेर त्याच्या घरच्यांनी बिहार मध्ये असलेल्या त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून वेगळाच जुगाड जमविला. तेथे ओळखीच्या असलेल्या कुटुंबांशी चांगले संबंध प्रस्थापित करून एका मुलीच्या वडीलांना लग्नासाठी तयार केले. वास्तविक या कुटुंबातील अन्य सदस्य या लग्नाच्या निर्णयाला तयार नव्हते. कारण दुसऱ्या राज्यात मुलगी सासरी पाठविणे त्यांना योग्य वाटत नव्हते. परंतु अखेर त्यांनाही गळ घातली. त्यामुळे त्या घरातील सदस्य आणि ती मुलगी विवाहासाठी तयार झाली.
परंतु या मागे मोठे कारस्थान आहे हे जेव्हा वधूच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना कळाले, तेव्हा चौकशीतून सर्व प्रकरण समोर आले. त्यामुळे हरियाणातून बिहार मध्ये आलेल्या नवरदेवाला वधूच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. इतकेच नव्हे तर त्याला पोलिसांच्या हवाली केले. त्यामुळे घोड्यावर बसण्याचे स्वप्न पाहणारा नवरदेव लॉकअपमध्ये बंद झाला याची सर्वत्र चर्चा होत आहे. हा खरोखर नवरदेव होता की तोतया वर बनवून तरुण मुलींची विक्री करणारी टोळी होती, याबाबत चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्नास हजारात मुलगी खरेदी करण्यासाठी हरियाणाहून आलेल्या नवरदेवा पाच जणांना बिहारमधील मुजफ्फरपूरच्या कटरा गावा मधून अटक करण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर कटरा पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरियाणातील तोतया नवरदेव बलबिंदर आणि नरेश कुमार यांच्यासह भवानीपूरच्या छोटन साहनी, त्याची पत्नी किरण देवी आणि मेहुणी शिवदुलारी देवी यांना अटक केली आहे. पाचही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
नवरदेवाकडच्या मंडळींनी सांगितले की, मुलगा वयाने मोठा आहे, पण त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे. कोणतीही अडचण येणार नाही. परंतु त्यांचा खोटा हेतू लक्षात येताच मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने पती आणि नातेवाईकांना माहिती दिली. यामुळे हे प्रकरण उघड झाले. कारण बलबिंदरचे हरियाणामध्ये लग्न होत नव्हते. त्यामुळे बिहारमध्ये मुलगी मिळवण्यासाठी त्याच्या अन्य दोघांनी 50 हजारात सौदा केला. 30 हजार रुपयेही आगाऊ घेतले होते. मुलगी हरियाणाला पोहोचल्यावर उर्वरित पैसे देण्याचे ठरले होते.
याआधीही बिहारच्या विविध भागातून मुलीला नेऊन अन्य राज्यात त्यांना विकले आहे का? आता पोलीस याबाबत माहिती गोळा करत आहेत. चौकशी केल्यानंतर पोलीस अलीकडच्या काही दिवसांमध्ये बेपत्ता मुली आणि मुलींबाबत माहिती गोळा करत आहेत. बिहारपासून हरियाणापर्यंत मुली नेण्यासाठी मोठे नेटवर्क असावे, असे पोलीसांना वाटते.