गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रसंग येथे घडला आहे. वरातीत घोड्यावर बसत असणाऱ्या नवरदेवाला घेण्यासाठी पोलिस आले. पोलिसांनी अटक केली आणि संपूर्ण वऱ्हाडासमोर त्याला गाडीत टाकून नेले. सध्या हा नवरदेव जेलची हवा खातो आहे.
लग्न एकीशी ठरले आणि पुष्पहार दुसरीच्याच गळ्यात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवरदेवाच्या हातात बेड्या पडण्याचे प्रकार काही वेळा घडतो. असाच प्रकार उत्तर प्रदेशात घडला. लग्नाची मिरवणूक काढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेव मुलाला आणि त्याच्या बपाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या मुलाचे एका मुलीशी लग्न ठरल्यानंतर त्याच्या वडिलांनी मिरवणूक दुसर्याच ठिकाणी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या नवऱ्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हा गोंधळ थांबविला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीसांनी सांगितले की, कालकागढ़ी येथे राहणाऱ्या युवकाचे लग्न बुलंदशहर येथे राहणाऱ्या मुलीबरोबर गेल्या वर्षी निश्चित झाले होते. कार्यक्रमानुसार वर येथून मिरवणूक घेऊन बुलंदशहर गाठले. तेथे जेवणाची पंगत चालू होती, त्याच वेळी की कोणीतरी तेथील पोलीस आणि प्रशासनाला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती दिली. त्यानंतर हे लग्न थांबले गेले होते. जेव्हा मुलगी योग्य वयात येईल, तेव्हा लग्न होईल असा निर्णय घेण्यात आला होता. आता मुलगी प्रौढ झाली आहे, तर मुलीच्या वडीलांनी पुन्हा लग्नाची तयारी सुरू केली, पण इकडे नवरदेव मुलगा आणि त्याच्या वडिलांनी मात्र नवरी मुलगी आणि तिच्या वडिलांना माहिती न देता दुसर्या ठिकाणी परस्पर लग्न निश्चित केले. त्यांनी नवरदेवाच्या लग्न मिरवणुकीची तयारी सुरू केली.
ही माहिती मिळताच गाझियाबादला आलेल्या पहिल्या नवरी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ लग्न मंडप गाठला आणि नवरदेव व त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले. नवरदेवाला कोठडीत ठेवले. त्यानंतर अनेकांनी मध्यस्थी केली. वधू-वर दोन्ही पक्षांतील लोकांना एकमेकांशी बोलून प्रकरण मिटवण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यांची चर्चा यशस्वी झाली नाही तर मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या पित्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगण्यात येते.