इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाहतुकीचे नियम पालन करणे आवश्यक आहे. मग तो कुणीही असो. मात्र काही जण स्वतःला अपवाद समजतात. आणि त्यातून मग अनेक प्रकार घडतात किंवा समोर येतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिस दंडात्मक किंवा अन्य कारवाई करतात. पोलिसांचे ते कर्तव्यच आहे. एका वाहनचालकाला पोलिसांनी दंड केला. त्यातच हा वाहनधारक वायरमन निघाला. या कारवाईचा राग आला म्हणून या वायरमनने थेट पोलीस चौकीचाच वीज पुरवठा खंडित केला. या प्रकारामुळे पोलीस चौकीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली. उकाड्याचाही त्रास सहन करावा लागला. या बदल्याच्या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा आहे.
हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडला आहे. वायरमन म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने रागाच्या भरात थेट पोलिसांचाच बदला घेतला आहे. एका पोलीस निरीक्षकाने या वायरमनवर कारवाई केली. वाहनाची कागदपत्रे नसल्याने त्याला दंड ठोठावला. त्यामुळे रागावलेल्या वायरनने थेट पोलीस चौकीचाच वीजपुरवठा खंडित केला. विशेष म्हणजे वीजेची वायर कापून वायरमन ती स्वत:सोबत घेऊन गेला. त्यामुळे पोलीस चौकीमध्ये अंधार पसरला. अखेर प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. वीज नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. सिरौली पोलीस ठाण्याच्या परिसरातील हरदासपूर पोलीस चौकीत हा धक्कादायक प्रकार घडला. या चौकीचे प्रभारी वाहनांची तपासणी करत होते. याच दरम्यान बसेर सब स्टेशनचे वायरमन भगवान स्वरुप हे बाईकने तिथून जात होते.
पोलीस निरीक्षक मोदी सिंह यांनी वायरमनला अडवले आणि बाईकचे पेपर दाखवायला सांगितले. सध्या माझ्याकडे बाईकचे कागद नाहीत. घरून आणून दाखवेन, असे भगवानने सांगितले. मात्र सिंह यांनी ऐकले नाही. याउलट त्यांनी ५०० रुपयांचा दंड ठोठावला. यामुळे भगवान नाराज झाला. त्याने वीज विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आणि पोलीस चौकीचा वीज पुरवठा खंडित केला. पोलीस कर्मचारी वायरमनला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तरीही त्यांनी विजेचे कनेक्शन पूर्ववत केले नाही.
हरदासपूर पोलीस चौकीत मीटरशिवाय विजेचा वापर केला जात असल्याचे भगवानने म्हटले आहे. मीटरशिवाय वीज वापरली जात असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे वीज विभागाचे मुख्य अभियंता संजय जैन म्हणाले. याबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले..
police action electricity wireman cut supply Uttar Pradesh Power supply chowki