नाशिक – जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक दीपक मोरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने नातेवाईकांसह पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेदाची बाब म्हणजे एएसआय मोरे कुटुंबासमवेत जेवणाच्या ताटावर बसले असतानाच काळाने घाला घातल्याने ही दुर्घटना सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे हे ग्रामीण भागात कर्तव्यावर होते. ते धात्रक फाटा राऊत मळा येथे रहायचे. मागील तीस वर्षांपासून त्यांची नोकरी अतिशय सुरळीत सुरू होती.
त्यादिवशीही ते नेहमीप्रमाणे नोकरीवर आले. त्यांची तब्येतही अतिशय ठणठणीत होती. दुपारी जेवणाची सुट्टी झाली. तेव्हा ते आपल्या धात्रक फाटा येथील राऊत मळ्यातील घरी जेवायला गेले. त्यांनी घरातल्यांना जेवायला वाढायला सांगितले. नेहमीप्रमाणे गप्पा-टप्पा करत जेवण सुरू केले. मात्र, अचानक त्यांच्या छातीत कळ आली. छाती दुखू लागली. श्वास घ्यायलाही त्रास सुरू झाला. त्यातच त्यांची शुद्ध हरपली.मोरे यांचा त्रास होत असल्याचे पाहून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिथे तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, मोरे यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबाला दिली. मोरे यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांना मृत्यूने जेवणाच्या ताटावर गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना त्यांच्या मृत्यूचा चटका बसला आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.