नाशिक – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरुध्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांना अटक करण्यासाठी नाशिककहून पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक यांच्यांसाह जवळपास २५ जणांची टीम गेली. पण, राणे यांना अटक होऊन महाड येथे जामीन मिळाल्यानंतर नाशिकच्या टीम माघारी परतली. पण, त्याअगोदर या टीमने राणे यांना यांना नोटीस दिली. त्यात २ सप्टेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत हजर राहण्याचे सांगितले आहे. या अटकेबाबत पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी सांगितले की, घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असे नारायण राणे यांनी न्यायालयात लिहून दिले म्हणून अटक केली नाही, त्यांना नोटीस बजावली आहे.
राणे यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर काल दिवसभर तणावाचे वातावरण शहरात होते. भाजपच्या कार्यालयात सकाळी युवासेनेने दगडफेक केली. त्यानंतर शिवसेना कार्यालयासमोर भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने – सामने आले. यावेळी चांगलाच राडाही झाला. त्यानंतर शिवसेनेने आंदोलन करुन निषेध केला. तर भाजपने आयुक्तांची भेट घेऊन दगडफेक प्रकरणात कारवाईची मागणी केली. नाशिकच्या या घटनेनंतर राज्यातही त्याचे हळूहळू पडसाद उमटले. दिवसभर विविध ठिकाणी गुन्हे आंदोलन सुरु होते. पण, रात्री राणे यांना जामीन मिळाल्यानंतर आता राज्यात तूर्त तरी तणावाचे वातावरण निवळले आहे.