जम्मू – भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून शत्रुत्वाचे संबंध असले तरी एके काळी दोन्ही देश म्हणजे एकच भूभाग होता. सहाजिकच या दोन देशांमध्ये तारेचे कुंपण असले आणि दोन्हीकडून कडक असा सैन्य दलाचा रात्रंदिवस पहारा असला तरी दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये प्रसंगी माणुसकीचे नाते आहे, याचा प्रत्यय काही वेळा येतो. पाक बद्दल माहिती नाही, पण निदान भारतीय नागरिक आणि सैनिक तरी अशी भावना व्यक्त करतो. असे दिसून येते. भारतीय चित्रपट सृष्टीत भारत-पाकिस्तान यांच्यातील या भावनिक नात्याविषयी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत यातील चित्रपट म्हणजेच ‘बजरंगी भाईजान’ होय. असा काहीसा प्रकार नुकताच या सिमेलगत घडला.
पुंछ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेच्या गुलपूर सेक्टरमधून घुसखोरी करून भारतीय हद्दीत घुसलेल्या तीन अल्पवयीन मुलांना लष्कराने पकडले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी नेण्यात आले. या तिघांची लष्कर आणि इतर एजन्सींनी भारतीय हद्दीत त्यांच्या येण्याबद्दल चौकशी केली, तेव्हा ही तीन मुले चुकून भारतीय हद्दीत शिरल्याची माहिती मिळाली. यानंतर सैन्यदलाचा जवान त्यांना त्यांच्यासोबत नमाज अदा करण्यासाठी मशिदीत घेऊन गेले. तसेच त्यानंतर त्यांना जवळच्या शाळेत नेले. तेथे शाळेत शिकणारी मुले पाहून तिघांचेही डोळे भरून आले. तो थोडा वेळ ही मुले शाळेतील मुलांकडे पाहतच राहिली. तीन दिवसही मुले भारतीय हद्दीत होती.
दुपारच्या सुमारास केजी ब्रिगेडचे कमांडर राकेश नायर यांच्याबरोबर ह तिघे चक्का दान बागमध्ये राह-ए-मिलानला पोहोचले. जेथे मेजर अमित, नायब तहसीलदार मोहम्मद रशीद यांनी या पाकिस्तानी मुलांना पाकिस्तानी अधिकारी मेजर वाहिद आणि मेजर सज्जाद यांना सुखरूप सोपवले. तेव्हा ही मुले भावनिक होऊन म्हणाले की, प्रत्येकाने भारतीय लष्कराकडून शिकले पाहिजे. कारण भारतीय लष्कराचे सैनिक आमच्याशी कुटुंबासारखे वागले. आम्ही आमच्या घरात आहोत, असे वाटले. विशेष म्हणजे यापूर्वी लष्करातील सैनिक आणि अधिकाऱ्यांकडून तिघांना भेट वस्तूही देण्यात आल्या होत्या.
केजी ब्रिगेडचे कमांडर नायर यांनी सांगितले की, तीन मुलांना सुरक्षितपणे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असून सीमेवरील सैनिक सतर्क आहेत. कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यास ते सक्षम आहेत. पुंछ जिल्ह्यातील चक्कन दा बाग परिसरातून पकडलेल्या तीनपैकी दोन मुले सख्खे भाऊ असून हे तिघेही पाकव्याप्त जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. ही तीन मुले मासेमारी करण्याच्या उद्देशाने बाहेर पडली होती आणि अनवधानाने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय बाजूने त्यांनी प्रवेश केला. यापुर्वी दोन मुलींनीही सीमा ओलांडल्या होत्या, त्यांना परत पाठवण्यात आले आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये दोन पाकिस्तानी नागरिक भारतीय सीमेत घुसले होते, ज्यांना देखील असेच परत पाठवण्यात आले.