नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कवी लक्ष्मण महाडिक यांच्या ‘स्त्री कुसाच्या कविता’ या काव्यसंग्रहाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात भि. ग. रोहमारे राज्यस्तरिय ग्रामीण साहित्य पुरस्कार आणि कै. भिकाजीराव हुसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिफण पुरस्कार यांचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात उत्कृष्ठ काव्यसंग्रहासाठी देण्यात येणारा भि. ग. रोहमारे राज्यस्तरिय ग्रामीण साहित्य पुरस्कार श्रीरामपूर येथील शब्दालय प्रा.लक्ष्मण महाडिक यांच्या ‘स्त्री कुसाच्या कविता’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.ट्रस्टकडे आलेल्या एकूण ७२ साहित्य कृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य परीक्षक प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, डॉ. बालाजी घारूळे, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांच्या संयुक्त निवड समितीने केले.
‘स्त्री कुसाच्या कविता’ या संग्रहातील सहा सुक्तांमध्ये विभागलेल्या कवितांमधून कवी लक्ष्मण महाडिक यांनी ग्रामीण वास्तवाचे प्रखर भान राखत जीवनातील सुखापेक्षा दुःखाच्या वेणा शांतपणे सहज बोलीभाषेत गावरान खेड्याच्या मराठमोळ्या पद्धतीने गुंफल्या आहेत. ग्रामीण जीवनाचे वर्तमान तटस्थपणे न्याहळून त्याचे विश्लेषण करण्याचे सामर्थ्य महाडिक यांच्या कवितेत आहे.
विशेषतः स्त्रियांच्या भरकटल्या जाणाऱ्या आयुष्याची भैरवी वाचताना वाचक गलबलून जातो. पुरस्कार योजनेचे ३४ वे वर्ष आहे. आजपर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील १६५ पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण माजी खासदार, आंतराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर व ज्येष्ठ कवयित्री, शब्दालय प्रकाशना च्या संचालक सुमतीताई लांडे यांच्या शुभहस्ते व कोपरगावचे माजी आमदार व कोपरगाव तालुका सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के. बी. रोहमारे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनी दि ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०. ०० वाजता के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे केले जाणार आहे.
तिफण पुरस्कार जाहीर
कन्नड येथील साहित्य, कला आणि लोक संस्कृतिला वाहिलेले त्रैमासिक तिफण या वाङमयीन नियतकालिकातर्फे दरवर्षी कै. भिकाजीराव हुसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिफण पुरस्कार देण्यात येतो. दखलपात्र साहित्यकृती किंवा लेखक-कवी, समीक्षक, चित्रकार, तसेच वाङ्मयीन चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एकाची निवड केली जाते. त्यासाठी प्रस्ताव मागितले जात नाहीत.तज्ञांच्या समितीने दर्शविलेल्या लक्षवेधी साहित्यकृतीचा विचारात केला जातो.सन २०२२ – २३ या वर्षातील तिफण पुरस्कारासाठी कवी लक्ष्मण महाडिक यांच्या ‘स्त्री कुसाच्या कविता’ या कविता संग्रहाची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी हा पुरस्कार धोंडोपंत मानवतकर, गणेश चंदनशिवे, दिप्ती राऊत, राजकुमार तांगडे, रमेश रावळकर यांना प्रदान करण्यात आले आहे. प्राचार्य लक्ष्मण महाडिक हे कादवा साखर कारखान्यावरील बी के कावळे माध्य व कनिष्ठ महाविद्यालय राजाराम नगर येथून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांचा’ कुणब्यांची कविता’ हा कवितासंग्रह यापूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. लक्ष्मण महाडिक यांचा’ स्त्री कुसाच्या कविता’ हा संग्रह म्हणजे स्त्रियांच्या जगण्याचे अनेक पदर त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यांचे सुख-दुःख त्यांनी अतिशय वास्तवपणे शब्दांकित केले आहे. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचे दोन राज्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.त्याचप्रणाने पंधरा-सोळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलेले आहेत.त्यांच्या कवितांचा शालेय तसेच विविध विद्यापीठाच्या बी.ए, आणि एम ए च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कवितांवर एम. फील आणि पी .एच डी संशोधन केले गेले आहेत.इतर भाषेतही त्यांच्या कवितांचा अनुवाद झालेला आहे.ते स्वतः उत्तम वक्ते आहेत.विविध विषयांवर महाराष्ट्रभर व्याख्याने देतात.तसेच माय मराठी राज्य अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.मराठी भाषा शिक्षकांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन कार्यात त्यांनी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा वाहून घेतले आहे.
औराळा ता. कन्नड येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सवात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या यशाबद्दल माजी शिक्षक आमदार कविवर्य नानासाहेब बोरस्ते, रवींद्र मोरे,चंद्रकांत कुशारे,संजय गीते आदींसह मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.त्यांच्या यशाबद्दल श्रीराम शेटे,आम.दिलीप बनकर,दत्तात्रय पाटील,तानाजी बनकर,भास्कर बनकर,माणिकराव बोरस्ते, विश्वास मोरे,दिलीप मोरे,प्रा. प्रकाश मोरे,बाळा साहेब क्षीरसागर, प्रकाश होळकर,संदीप जगताप,शिवाजी निरगुडे,भास्कर भगरे,सुरेश खोडे,दत्तात्रय डुकरे,रामराव पाटील,राजेंद्र डोखले,राजाभाऊ शेलार,सुहास मोरे आदींसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
Poet Laxman Mahadik Book State Awards