मुंबई – पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसाठी देशभर मारामार असल्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागले. त्यात घरी उपचार करणाऱ्यांसाठी छोटे ऑक्सिजन सिलिंडर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही लोकांनी घेतले. पण आता चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही चक्क खिशातच ऑक्सिजन बाळगू शकता.
कानपूरच्या आयआयटीतीचे माजी विद्यार्थी डॉ. संदीप पाटील यांनी हे अनोखे संशोधन केले आहे. ई-स्पिन नॅनोटेक कंपनीचे ते सर्वेसर्वा आहेत. त्यांनी ऑक्सिराईज नावाची एक बाटली तयार केली आहे. यात १० लिटर ऑक्सिजन ठेवता येतो. इमर्जन्सीमध्ये रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी या बाटलीचा मोठा आधार होऊ शकतो. केवळ ४९९ रुपयांमध्ये ही बाटली ऑनलाईन उपलब्ध आहे.
एवढेच नव्हे तर संदीप पाटील यांच्या कंपनीने पाच लेयरचा एन-९५ मास्कही तयार केली आहे. या संशोधनात त्यांच्यासोबत नितीन चरहाटे, सोहेल पटेल आणि मयूरही सहभागी आहेत. ३०० ग्रॅमच्या बाटलीमध्ये १० लिटर ऑक्सिजन भरण्यात आले आहे. एका बॉटलमधून ऑक्सिजनचे २०० शॉट घेतले जाऊ शकतात.
डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल झाले. ते बघवत नसल्यामुळे आम्ही हे संशोधन केले. हे ऑक्सिजन पोर्टेबल आहे. आपात्कालीन परिस्थितीत उपयुक्त आहे. यातून तोंडाद्वारे स्प्रेच्या माध्यमातून ऑक्सिजन घेता येते. कंपनीच्या swasa.in या संकेतस्थळावरून याची ऑनलाईन विक्री सुरू आहे. दररोज १००० बॉटलचे उत्पादन सध्या घेतले जात आहे.
अस्थमाच्या रुग्णांसाठी उपयुक्त
अस्थमाचे रुग्ण तसेच ऊंच भागांवर तैनात असलेल्या जवानांसाठी हे ऑक्सिजन उपयुक्त आहे. याशिवाय मेडीकल किटमध्ये ही बाटली सहज ठेवता येण्यासारखी आहे.