पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता PRN रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेच्या दोन संधी मिळणार आहे. सत्र पूर्तता संपल्याने परीक्षांपासून वंचित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये २ अतिरिक्त परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार. समकक्षतेप्रमाणे विद्यापीठ परीक्षा ऑक्टो./नोव्हे.२०२४ आणि मार्च/एप्रिल २०२५ मध्ये या परीक्षा देता येणार आहेत.
गेल्या वर्षी असाच निर्णय घेवून विद्यापीठाने १ लाख २८ हजार मुलांना संधी दिली होती. त्यापैकी ८५ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी अंदाजे ३५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले होते. अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेणारे देशात पुणे विद्यापीठ एकमेव असावे असे बोलले जात आहे.
या निर्णयाबाबत सिनेट सदस्य सागर वैद्य म्हणाले की, यावर्षीही अशी अतिरिक्त सुविधा द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत होती. या संदर्भात विद्यापीठाच्या प्रशासनाकडे आमचा पाठपुरावा सुरू होता. अखेर यावर्षीही दोन परीक्षा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेवून विद्यापीठाने शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली आहे. याबद्दल कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा संचालक डॉ.महेश काकडे आदींसह सर्व मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, अकॅडमिक कौन्सिल सह सर्व संबंधितांचे आभार मानले आहे.
आता महाविद्यालयांनी एकही विद्यार्थी सत्र पूर्ततेअभावी परीक्षांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. परीक्षा अर्ज भरून घ्यावे. विद्यार्थ्यांना योग्य माहिती वेळोवेळी द्यावी.
सत्र पूर्तता मिळालेल्या फॉर्म्युलाचा N+2+1चा तक्ता दिला आहे.