नवी दिल्ली – बँकखात्यात कमीत कमी रक्कम ठेवली नाही, तर बँक तुमच्या खात्यातून काही रक्कम कापते. अशा प्रकारचा फटका काही ग्राहकांना बसला आहे. २०२०-२१ मध्ये पंजाब नॅशनल बँकेने खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवणा-या ग्राहकांकडून १७० कोटी रुपये वसूल केले आहेत. २०१९-२० च्या तुलनेत ही रक्कम कमीच आहे. तेव्हा बँकेने २८६.२४ कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल केले होते. मध्य प्रदेशचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी आरटीईअंतर्गत बँकेकडून ही माहिती मागितली होती.
गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पीएनबीने ३५.४६ कोटी रुपये सरासरी उर्वरित शुल्क वसूल केले आहे. हे शुल्क दोन्ही बचत आणि चालू खात्यांवर लावलण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत बँकेने असे कोणतेही शुल्क लावले नव्हते. तिस-या आणि चौथ्या तिमाहीत बँकेने प्रत्येकी ४८.११ कोटी आणि ८६.११ कोटी रुपये वसूल केले आहेत. त्याशिवाय गेल्या आर्थिक वर्षात एटीएम शुल्कातून ७४.२८ कोटी रुपये वसूल केले. तर २०१९-२० मध्ये बँकेने या शुल्कातून ११४.०८ कोटी रुपये वसूल केले होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारने निर्देश दिल्यानंतर बँकेने एटीएम शुल्कातून सवलत दिली होती. दुस-या प्रश्नाच्या उत्तरात बँकेने सांगितले की, ३० जून २०२१ पर्यंत बँकेचे ४,२७,५९,५९७ खाते निष्क्रीय होते. तर १३,३७,४८,८५७ खाते सक्रिय होते.