मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या सहा महिन्यांमध्ये काही मोठ्या उद्योजकांकडून बँकांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार उघड झाले आहेत त्यातच आता शहरातील वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ३८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीआय म्हणते…
या दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदार ही केंद्रीकृत बँक असून आरोपींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात सुमारे २७० कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात ११८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकूण सुमारे ३८८ कोटी रुपयांची फसवणूक वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने केल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता वरुण इंडस्ट्रीजच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या कंपनीने बॅंकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर सीबीआयने या कंपनीच्या दोन्ही संचालकांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या फसवणुक प्रकरणातील आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे, वरुण इंडस्ट्रीजची एक कंपनी असलेल्या वरुण ज्वेलने पीएनबी बँकेकडून कर्ज घेतल्याने या पीएनबीला सुमारे ६३ कोटींचे नुकसान झाले आहे. तर या कंपनीने कर्ज घेऊन त्यातील ८ कोटी रुपये हे मॉरिशसमधील सहाय्यत कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
कर्जाचा वापर यासाठी
वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटरने २०१४ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून २९ कोटी रुपयांचा कर्ज घेतले होते आणि या कर्जातूनच अनेकांना पैसे हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तब्बल १९० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप देखील ट्रायमॅक्सवर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कर्जदार कंपनीने इतर अनेक बँक खात्यांमधून पैसे काढून घेतले आणि राउटिंग सेलद्वारे होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. तपासानंतर सीबीआयने वरुण इंडस्ट्रीज विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या फर्मवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर उद्योग व बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
PNB Maharashtra Bank Mumbai Fraud FIR Case