नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत आतापर्यंत ८ लाखाहून अधिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत २१००० कोटींपेक्षा जास्त ‘मार्जिन मनी सबसिडी’चे वितरण करून देशभरात ६८ लाखांहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष डॉ. मनोज कुमार यांनी यावेळी बोलताना दिली. “नोकरी शोधण्याऐवजी नोकरी प्रदाता व्हा” या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बोधवाक्याचा डॉ. मनोज कुमार यांनी पुनरुच्चार केला. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना त्यांचा स्वतःचा उद्योग स्थापन करता यावा यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग देशाच्या कानाकोपऱ्यात विविध रोजगाराभिमुख योजना राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील हिंडौन सिटी येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित एका कार्यक्रमात, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार यांच्या उपस्थितीत राजस्थानच्या करौली-धोलपूर लोकसभा सदस्य डॉ. मनोज राजोरिया यांच्या हस्ते आज मधमाशी पालकांना मधमाश्यांच्या वसाहती असलेल्या ३०० पेट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजोरिया यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत (PMEGP) प्रकल्पांसाठी २९६.१९ कोटी मंजूर कर्जासह ३०८३ लाभार्थ्यांना १००.६३ कोटी रुपये ‘मार्जिन मनी सबसिडी’चे वाटप देखील केले. यामुळे सुमारे २५,००० लोकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.