नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज येथे महाकुंभ मेळाला भेट देणार आहेत. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते संगमावर पवित्र स्नान करून गंगा मातेची पूजाअर्चना करतील.
महाकुंभ २०२५, पौष पौर्णिमेपासून (१३ जानेवारी २०२५) सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा आहे. संपूर्ण जगभरातून लाखो भाविक यासाठी येत असून महाकुंभ २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी व प्रसारासाठी पंतप्रधानांनी नेहमीच महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. तीर्थस्थळी पायाभूत सुविधा आणि सेवांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याआधी, १३ डिसेंबर रोजी प्रयागराज दौऱ्यात, पंतप्रधानांनी ५,५०० कोटी रुपयांच्या १६७ विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामुळे संपर्क सुविधा, सोयीसुविधा आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.