इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जोरदार टीका केली. बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बिहारमध्ये १३,४८० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण आज त्यांनी केले. त्याचबरोबर अमृत भारत एक्सप्रेस आणि नमो भारत रॅपिड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
या कार्यक्रमा पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहलगाम येथील हल्ला हा भारतमातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला. त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही मातीत गाडण्याची वेळ आली आहे अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला.
ते पुढे म्हणाले की, आज, बिहारच्या भूमीवर, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण राष्ट्र या संकल्पात एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो… शिक्षा महत्त्वपूर्ण आणि कठोर असेल, ज्याचा या दहशतवाद्यांनी कधीही विचारही केला नसेल…