इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मूळ भारतीय असलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला आहे. अक्षता या भारतातील अग्रणी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संचालक नारायण व सुधा मूर्ती यांच्या कन्या होत.
इन्फोसिसमध्ये अक्षता यांचे भागभांडवल आहे. अक्षता यांचे इन्फोसिसमध्ये अंदाजे ०.९४ टक्के शेअर्स आहे. भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसची स्थापना त्यांचे वडील नारायण मूर्ती यांनी केली होती.इन्फोसिसच्या शेअर्सच्या घसरणीत, पैसे गमावलेल्या इन्फोसिसच्या शेअरहोल्डर्सच्या यादीत यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचाही समावेश आहे. अक्षता मूर्तीकडे ३,८९,५७,०९६ इन्फोसिसचे शेअर्स आहेत, दलाल स्ट्रीटवरील शुक्रवारच्या एका तासाच्या सत्रानंतर अक्षता मूर्तींच्या निव्वळ संपत्तीत सुमारे ४१२ कोटी रुपयांची घसरण झाली.
आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने कमकुवत जागतिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल वाढीशी संबंधित अंदाज कमी केला आहे. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. एप्रिल-जून २०२३ तिमाहीत कंपनीने कमावलेला निव्वळ नफा देखील बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी होता. यामुळे इन्फोसिसबाबतचे शेअर बाजारातील वातावरण बिघडले आहे. आजच्या शेअर्स स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ते बीएसईवर ७.६४ टक्क्यांनी घसरून १३३८.१० रुपयांवर व्यवहार करत आहेत. इंट्रा-डेमध्ये शेअर १३११.६० रुपयांपर्यंत खाली आला होता.
कमी किंमतीत मिळू शकणार शेअर्स
तज्ज्ञांच्या मते, इन्फोसिसने महसूल वाढीशी संबंधित अंदाज कमी केला आहे हा बाजारासाठी एक मोठा धक्का आहे. कारण बाजारपेठ त्यासाठी तयार नव्हती. हा धक्का अल्प कालावधीचा असून गुंतवणूकदारांना शेअर कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.