नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, तुरुंगातील दोषींच्या चांगल्या वागणुकीमुळे सुटकेचे आदेश दिले जात आहेत. याआधी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेतील दोषी पेरारिवलनची सुटका करण्याचे आदेशही दिले होते.
शुक्रवारी मोठा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहाही दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले. या दोषींमध्ये राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचाही समावेश आहे.
राजीव गांधी हत्येतील सहाही दोषींवर निर्णय सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की तुरुंगात शिक्षा झालेले एस नलिनी, जयकुमार, आरपी रविचंद्रन, रॉबर्ट पियास, सुतेंद्रराजा आणि श्रीहरन यांना चांगल्या वर्तनासाठी तुरुंगातून सोडण्यात आले आहे. तुरुंगातील त्यांचे वर्तन चांगले असल्याचे आढळून आले आणि या सर्वांनी तुरुंगात असताना विविध पदव्या प्राप्त केल्या होत्या.
एका दोषीची सुटका
न्यायालयाने सांगितले की तामिळनाडू मंत्रिमंडळाने ९ सप्टेंबर २०१८ रोजी दोषींना सोडण्याची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात माजी पंतप्रधानांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याच्या तपासात सात जण दोषी आढळले. ज्यामध्ये एका दोषी पेरारिवलनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु मे महिन्यात त्यालाही सर्वोच्च न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले होते.
PM Rajiv Gandhi Assassination Accused Direct Release
Supreme Court Legal