इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो, गेली दोन वर्ष कोरोनाच्या संसर्गामुळे योग दिन नागरिकांनी घरातल्या घरात साजरा केला होता. यंदा मात्र कोरानाचे संकट टळल्याने तो देशभरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
योग दिनासंदर्भात सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून नवी दिल्ली येथे देखील याची युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनी नैनिताल येथे इयत्ता सहावीची विद्यार्थिनी दीपा गिरी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत योगाभ्यास करणार आहे. याकरिता दीपा तिची ट्रेनर कांचन रावतसोबत गुरुवारीच दिल्लीला रवाना झाली आहे. राज्यातील 15 विद्यार्थिनींसह दीपाची निवड झाली आहे.
उत्तराखंडमध्ये अॅडव्होकेट जनरल ऑफिसमध्ये माळी काम करणारे किशन गिरी आणि आई कमला यांची मुलगी 11 वर्षीय दीपा ही नैनितालच्या तल्ला कृष्णपूर भागातील रहिवासी आहे. ती नऊ वर्षांपासून योगा करत असून तिला योगामध्येच करिअर करायचे आहे. दीपाने राज्यस्तरीय ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला आणि चांगली कामगिरी केल्यानंतर तिची राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडसाठी निवड झाली.
योग ऑलिम्पियाडला पंतप्रधानही येणार असल्याचे कळताच ती खूप उत्साहित झाली. मुख्याध्यापिका सावित्री दुगतल यांच्या मते, दीपा खूप आशादायी आहे. त्याच्या चांगल्या भविष्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. दीपा तीन बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. कॉलेजच्या इन्स्ट्रक्टर कांचन रावत यांनी तिला योगा करण्यासाठी प्रेरित केले. मुलीची पीएमसोबत योगासाठी निवड झाल्यावर कुटुंब खूप उत्साहित आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलीने आपले नाव रोशन केले आहे. आपल्या मुलीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहेत.
योग दिनानिमित्त केंद्र सरकारचे 75 मंत्री देशातील 75 ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक केंद्रांवर योगाभ्यास करणार आहेत. कर्नाटकातील म्हैसूरच्या राजवाड्यात पंतप्रधान स्वतः योगा करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात, राजनाथ सिंह कोईम्बतूर, नितीन गडकरी नागपूर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर दिल्लीच्या कमळ मंदिरात आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीच्या जंतरमंतर येथे योग करणार आहेत.
दि. 21 जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिनाची थीम ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’ अशी आहे. याबाबत पीएम मोदींनी सांगितले होते की, यावेळी खूप विचारविनिमय करून योग दिनाची थीम ठेवण्यात आली आहे. योगाने कोविड महामारीच्या काळात दुःख कमी करण्यासाठी मानवतेची कशी सेवा केली आहे. योग दयाळूपणा आणि करुणेने नागरिकांना एकत्र आणेल आणि एकतेची भावना वाढवेल. गेल्या वेळी थीम होती योग फॉर वेलनेस अशी होती.
pm narendra modi yoga with 11 year old girl nainital deepa international yoga day