नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी स्वीकारण्यास पूर्णपणे तयार असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताला रविवारपासून (१ ऑगस्ट) पुढील एक महिना सुरक्षा परिदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पातळीवर कोरोना महामारी, समुद्री सुरक्षा, अफगाणिस्तान आणि दहशतवाद हे मुद्दे ऐरणीवर असताना भारताला ही संधी मिळणे महत्त्वाचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधीच्या रूपाने या पदावर विराजमान होण्याची शक्यता आहे. या पदावर विराजमान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरतील.
पुढील महिन्याचा अजेंडा यूएनएससीकडून अधिकृतरित्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. अजेंड्यामध्ये महत्त्वाच्या मुद्यांचा अंतर्भाव करण्यासाठी भारत रणनीतीकदृष्ट्या महत्त्वाच्या भागीदार फ्रांस, अमेरिका, रशियासारख्या मित्रदेशांच्या संपर्कात आहे. पुढील एका महिन्यादरम्यान यूएनएससीमध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला संबोधित करणार आहेत.
९ ऑगस्टला मोदी संबोधित करणार
संयुक्त राष्ट्रात भारताचे माजी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ऑगस्टला यूएनएससीच्या एका कार्यक्रमात अध्यक्षपदावरून संबोधित करणार आहेत. याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकरसुद्धा भारताच्या हितांशी संबंधित मुद्दे उपस्थित करून भारताची बाजू मांडणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन संबोधन करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत. त्यामुळे ते एक इतिहासच घडविणार आहेत.
संतुलन स्थापन करण्याचे प्रयत्न भारत करणार असल्याचे जयशंकर यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. आंतराराष्ट्रीय नियमांचे पालन करून चर्चांद्वारे अनेक प्रश्न सोडविण्याची भारताची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची सांगतात, सन्मान, संवाद, सहकार्य, शांती आणि समृद्धी या पंचसूत्रीवर भारताचा भर असणार आहे. भारत यापूर्वी १९५०-५१, ६७-६८, ७२-७३, ७७-७८, ८४-८५, ९१-९२ आणि २०११-१२ या वर्षांमध्ये यूएनएससीचा सदस्य राहिला आहे. भारताने यासाठी दोन महिन्यांपासूनच तयारी सुरू केली होती. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी स्वतः रशिया आणि अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी चर्चा सुरू केली होती.