इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अेमेरिका दौऱ्यावर आहेत. २१ ते २४ जून या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा ठरला आहे. पण या दौऱ्यातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे मोदींच्या मुक्कामाचे हॉटेल आहे.
पंतप्रधान मोदी यापूर्वी अमेरिकेत गेले तेव्हा न्यूयॉर्कमधील याच हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. लोटे न्यूयॉर्क पॅलेस असे या हॉटेलचे नाव असून इथेल्या खोल्यांचे एका रात्रीचे भाडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. इथे किंग साईझ बेडच्या खोलीकरिता एका रात्रीसाठी ४८ हजार रुपयांपासून दर सुरू होतात. हे भाडे एक दोन लाखांवर येऊन थांबत नाही, तर थेट १२ लाख रुपयांपर्यंत जाते. म्हणजे या ठिकाणी सर्वांत प्रिमीयम खोलीत राहायचे असेल तर तुम्हाला एका रात्रीसाठी १२ लाख रुपये मोजावे लागतील. या पंचतारांकित हॉटेलमध्ये ७३३ खोल्या आहेत.
येथील टॉवर्स आणि रॉयल स्वीट्स कलेक्शनमध्ये सुद्धा राहण्याची सोय आहे. न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित हॉटेलपैकी एक असलेल्या या फाईव्ह स्टारमध्ये किंग साईज बेडच्या खोलीसाठी एका रात्रीकरिता लाखो रुपये मोजावे लागतात, हे विशेष. सेंट्रल पार्कपासून जवळपास दहा बारा मिनीटांच्या अंतरावर मॅडिसन अव्हेन्यूवर हे हॉटेल आहे. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यात यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. दोन्ही देशांमधील विश्वास वाढवण्यासाठी नागरिक व त्यांचे संबंध महत्त्वपूर्ण ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मोदींनी म्हटले आहे.
सरकारी डीनर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सरकारी डिनरचे आयोजन केले होते. त्यानंतर न्यूयॉर्कहून ते वॉशिंग्टन डीसीला जाणार असून तिथे बायडेन यांच्याशी चर्चा करणार आहेत.