पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होत आहे. आज सकाळी पंतप्रधानांचे पुण्यात आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे. बघा, या अनावरण समारंभाचा व्हिडिओ
PM Shri @narendramodi unveils statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Pune. #MaharashtraWithModi https://t.co/EYAglKmTMx
— BJP (@BJP4India) March 6, 2022
थोड्याच वेळात पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल. यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल. बाणेर येथे 100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही पंतप्रधान लोकार्पण करतील. पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर, दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करतील.