नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नाही तर जगभरातच लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवन कार्याविषयी सर्वांना नेहमीच उत्सुकता असते. भारताला विश्वगुरू बनण्यासाठी मोदी नेहमीच आपल्या भाषणात उल्लेख करीत असतात. मोदींची नेमकी संपत्ती किती, त्यांची मालमत्ता कुठे आणि किती आहे, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आज त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया…
हलाखीची स्थिती
नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमध्ये १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. त्यांचे कुटुंब समाजातील शोषित आणि वंचित असणाऱ्या ‘इतर मागासवर्गीय’ गटातील होते. गरीब परंतु प्रेमळ कुटुंबात त्यांचे बालपण गेले, त्यांच्याकडे कधी जास्तीचा एक रुपयासुद्धा नसायचा. आयुष्यातील सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीने त्यांना कठोर परिश्रमाचा धडा दिला. त्याच काळात सामान्य जनतेच्या हालअपेष्टांची त्यांना जाणीव झाली. यातूनच तरुण वयात देशासाठी आणि जनतेच्या सेवेत स्वत:ला वाहून घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीच्या काळात, त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या संघटनेबरोबर काम केले. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टी संघटनेबरोबर काम करताना त्यांनी स्वत:ला राजकारणात झोकून दिले. गुजरात विद्यापीठातून मोदी यांनी राज्यशास्त्रात एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
२.२३ कोटींची संपत्ती
मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. सध्या पंतप्रधानपदाची मोदी यांची ही दुसरी टर्म आहे. मोदींचे वय ७२ वर्षे आहे. मोदींच्या संपत्तीबाबत पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे. मोदी हे एकूण २.२३ कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मोदींच्या संपत्तीत वर्षभरात २६ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मोदींकडे कोणतीही अचल संपत्ती नाही. वास्तविक, त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या वाट्याची जमीन दान केली आहे.
२६ लाखांची वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही बाँड, स्टॉक किंवा म्युच्युअल फंडात (एमएफ) गुंतवणूक केलेली नाही. त्यांचे स्वतःचे वाहन आहे. त्यांच्याकडे १.७३ लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. ३१ मार्च २०२२ पर्यंत घोषित केलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, मोदींची एकूण संपत्ती २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत एकूण २६.१३ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
रोख पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर २००२ मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. तसेच रिअल इस्टेट सर्व्हे नंबरवर त्याच्याकडे मालकी हक्क नाही कारण त्यांनी त्यांच्या वाट्याची जमीन दान केली होती. ३१ मार्च २०२२ पर्यंत, पंतप्रधान मोदींकडे एकूण रोख फक्त ३५ हजार २५० रुपये आहे. याशिवाय, पोस्ट ऑफिसमध्ये ९ लाख ५ हजार १०५ रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) आहेत. तर, त्याच्याकडे १ लाख ८९ हजार ३०५ रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.
निवासी मालमत्ता
२०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कोणतीही संपत्तीची खरेदी केलेली नाही. त्यांच्या निवासी मालमत्तेची बाजार भावानुसार सध्याची किंमत १.१ कोटी रुपये इतकी आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सरकारने निर्णय घेतला होता की सार्वजनिक जीवनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यांची मालमत्ता आणि दायित्वे स्वेच्छेने जाहीर करावी लागतील. पंतप्रधान मोदींच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. पंतप्रधानांच्या वेबसाइटवर याची माहिती पाहता येते.
PM Narendra Modi Total Wealth Know Details