मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवार दिनांक 19 जानेवारी रोजी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन होणार असून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7 चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्ज वितरण आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत.
मेट्रो रेल्वे मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते सुमारे 12 हजार 600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण होणार आहे. यातील दहिसर पूर्व आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2 अ ही सुमारे 18.6 किमी लांबीची आहे, तर अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे. सन 2015 मध्ये या मार्गिकांची पायाभरणी देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केली होती. यावेळी प्रधानमंत्री मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा प्रारंभ करतील. सुलभ प्रवासासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असून मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर ते दाखवता येईल आणि याच्या मदतीने युपीआय (UPI) द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल.
सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी
याच कार्यक्रमात प्रधानमंत्री सुमारे 17 हजार 200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी करतील. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे ही सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता प्रतिदिन सुमारे 2 हजार 460 एमएलडी इतकी असेल.
20 नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण
मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री या कार्यक्रमात वीस नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी, औषधे, रोगनिदान यासारख्या आवश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहेत. याशिवाय, 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील लाखो नागरिकांना यामुळे उच्च श्रेणीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
400 किमी लांबीच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6 हजार 79 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे वाढीव सुरक्षेसह जलद प्रवासाची सुनिश्चिती होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी
प्रधानमंत्री श्री. मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. टर्मिनसच्या दक्षिणेकडील हेरिटेज नोडच्या (वारसा स्थळी) ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे, सुविधा वाढवणे, अधिक चांगले मल्टी-मोडल समन्वयन आणि या जगप्रसिद्ध प्रतिष्ठित संरचनेचे भूतकाळातील वैभव जतन आणि संवर्धन करणे या उद्देशाने ही पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 800 कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहेत.