मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज, रविवार दि. ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागपूर दौऱ्यावर येत असलेले प्रधानमंत्री श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असे सांगत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत असून आपल्या राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
असा आहे पंतप्रधानांचा दौरा
रविवारी, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होणार असून त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज १ चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. या काळात प्रधानमंत्री श्री. मोदी नागपूर मेट्रोमधून प्रवास करणार असून झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास देखील करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर ते थेट ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे उद्घाटन करण्यासाठी प्रस्थान करतील. नागपूर ते बिलासपूर या देशातील सहाव्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या सहा ते साडे सहा तासात गाठता येणे शक्य होणार आहे. सध्या हे अंतर कापण्यास ७ ते ८ तास लागतात. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेतर्फे ही गाडी चालवली जाणार आहे. 16 कोच असणाऱ्या या गाडीची आसनक्षमता १ हजार १२८ आहे. नागपूर ते बिलासपूरदरम्यान या गाडीला फक्त गोंदिया दुर्ग व रायपूर येथेच थांबा देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री रेल्वे स्टेशवरून झिरो माईल जवळील फ्रीडम पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थितीत राहतील. त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल. या प्रकल्पाची एकूण लांबी ४० किलोमीटर असून एकूण खर्च ९ हजार २७९ कोटी रुपये आहे. प्रवासी क्षमता १ लाख ५० असणार आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रो दोन या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांचा हस्ते होईल. नागपूर मेट्रो-२ हा एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्याअंतर्गत ४३८ किलोमीटरची मेट्रो लाईन तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षात म्हणजे २०२८ पर्यत पूर्ण होईल. खापरीला बुटीबोरी एमआयडीसी (१८.६ कि.मी. ) ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हान (१३ किमी ) प्रजापतीनगरला कापसी (५.५ कि.मी.) तर लोकमान्यनगरला हिंगणा(६.७ कि.मी.) शहराशी जोडले जाईल.
प्रधानमंत्री त्यानंतर फ्रीडम पार्क येथून मेट्रोने खापरीला रवाना होतील. प्रवासादरम्यान विविध वर्गातील नागरिक, महिला व मुलांशी ते संवाद साधतील. खापरीला पोहोचल्यावर वाहनाने समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट येथे पोहोचतील. संपूर्ण राज्यासाठी भाग्यरेखा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ७२० किलोमीटरच्या अत्यंत महत्वाकांक्षी महामार्गाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या रस्त्यावरून ते दहा किलोमीटर वाहनाने प्रवास करणार आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) टेंपल ग्राऊंड येथे प्रधानमंत्री यांची जाहीर सभा होणार आहे. १४ एप्रिल २०१७ रोजी प्रधानमंत्री महोदयांनी या संस्थेचे भूमिपूजन केले होते. उद्या राष्ट्राला ही संस्था समर्पित करण्यात येणार आहे. मध्य भारतातील सर्व सुविधायुक्त ही आरोग्यसंस्था असून निर्मितीसाठी सुमारे १ हजार ५७७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याच कार्यक्रमादरम्यान सिपेट – सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे आनलाईन लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्य शासनाने या संस्थेसाठी 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. सर्व सोईसुविधांनी युक्त ही संस्था आहे. यासोबतच नागपुरात होणाऱ्या नॅशनल इंस्टिट्यूट फॅार वन हेल्थ या संस्थेचा शुभारंभ करण्यात येईल. तसेच सेंटर फॅार रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल आफ हेमोग्लोबिनोपॅथिस या चंद्रपूरच्या संस्थेची आनलाईन पद्धतीने उदघाटन करतील. कार्यक्रमादरम्यान या संस्थांचे माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर प्रधानमंत्री पुढील कार्यक्रमासाठी गोव्याकडे प्रस्थान करतील.
समृद्धी महामार्गाविषयी:-
– नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे.
– सदर महामार्गास दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजीच्या शासननिर्णयाव्दारे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असे नाव देण्यात आले आहे.
– पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे.
– सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.
– सदर प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
– प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण ८४ बांधकामे प्रस्तावित होती तथापि, गरजेनुसार ही बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.
– सद्यस्थितीत १ ते ११ (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.
– पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
PM Narendra Modi Today Nagpur Tour
Samruddhi Mahamarga Inauguration Highway