नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय झाली आहे. दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये दररोज हजारोच्या संख्येने बाधित आढळून येत आहेत. दिल्लीची वाटचाल पूर्णपणे लॉकडाऊनच्या दिशेने सुरू आहे. अनेक राज्यांनी कोरोना निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित होते तर त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आरोग्य सचिव आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढ्याला आता तीन वर्षे होत आहेत. तरीही आपण पूर्ण विजय मिळवू शकलेलो नाही. विजय मिळवायचा असेल तर आपल्याला नियमांचे पालन करावेच लागेल. उद्योग व व्यापार बंद करणे हा पर्याय नाही. लहान लहान कंटेनमेंट झोन तयार करणे आणि संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा गाडा योग्य चालायचा असेल तर आपल्याला काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने २३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याद्वारे अनेक राज्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा बळकट केल्या आहेत. गृहविलगीकरणाचा उत्तम पर्याय आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यावा. नागरिकांना नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करावे, हे सक्षम पर्याय असल्याचे मोदी म्हणाले. तसेच, यापुढील काळात देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही विचार केला जाणार नाही, असेही मोदींनी स्पष्ट केले.
https://twitter.com/narendramodi/status/1481603277800501249?s=20