इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरुद्ध सुरू केलेली सैनिकी कारवाई अजूनही सुरूच आहे. जगाने युद्धबंदीसाठी अनेक प्रयत्न केले, परंतु रशियाचा हल्ला सतत सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही देशांच्या प्रमुखांसह इतर देशांच्या सतत संपर्कात आहेत. या संघर्षावर चर्चेतून तोडगा काढावा यासाठी भारत सल्ला देत आहे. दरम्यान, युक्रेनमधील युद्ध समाप्त होण्याच्या दिशेने मध्यस्थता करण्यासाठी भारत, तुर्की, चीन, इस्रायल या देशांच्या संपर्कात असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस एंटोनिओ गुटारेस यांनी म्हटले आहे.
गुटारेस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “या प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या उद्देशाने मध्यस्थीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यासाठी दोन्ही बाजूच्या सर्वोच्च स्तरांवर चर्चा सुरू असलेल्या अनेक देशांच्या मी जवळच्या संपर्कात आहे. मी तुर्कीच्या मित्रांसोबत खूपच जवळच्या संपर्कात आहे. अशाच प्रकारे भारत, कतार, इस्रायल, चीन, फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांशी जवळच्या संपर्कात आहे. युद्ध थांबविण्यासाठी परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रयत्न आवश्यक आहेत, यावर माझा विश्वास आहे”. “सर्व देश तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहेत का”? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मला अशी आशा आहे”.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की म्हणाले, की युक्रेन तटस्थ राहण्याची घोषणा करण्यास तसेच देशातील बंडोखर झालेल्या पूर्व भागांवर चर्चा करून करार करण्यास तयार आहे. आगामी दोन दिवसात होणाऱ्या दोन्ही देशांच्या चर्चेपूर्वी जेलेंस्की यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. तथापि, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा केली तरच हे युद्ध समाप्त होऊ शकते, याचा पुनरुच्चार जेलेंस्की यांनी केला आहे.
रशियाच्या एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेलेंस्की म्हणाले, की आम्ही आमच्या देशाचा अण्वस्त्र नसलेला दर्जा, सुरक्षेची हमी आणि तटस्थता काय ठेवण्यास तयार आहोत. कोणत्याही करारांतर्गत आम्हाला सुरक्षेची हमी हवी आहे. नोटोमध्ये सहभागी होण्याची आशा युक्रनेने सोडावी, अशी मागणी रशिया करत आहे. जेलेंस्की यांनी यापूर्वी हे उपाय सुचवले होते परंतु इतक्या ठामपणे त्यांनी मुद्दे मांडले नव्हते. त्यांच्या या वक्तव्यामुळे इस्तांबुलमध्ये होणाऱ्या नव्या चर्चेला गती मिळण्याची शक्यता आहे.