पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथील मेट्रोच्या विस्तारित मार्गाचा लोकार्पण सोहळा येत्या १ ऑगस्टला होणार आहे. बटन दाबून पंतप्रधान मोदी हा मार्ग नागरिकांसाठी खुला करणार आहे. मुख्य म्हणजे शनिवार-रविवार या विकेंडला पुणेकरांना सवलतीच्या दरात मेट्रोचा प्रवास करता येणार आहे.
मागील काही दिवसांपासून मेट्रोचा विस्तारित मार्ग रखडला होता. त्यामुळे हा मार्ग कधी खुला होणार, याबाबत नागरिकांना प्रतीक्षा होती. अखेर आता येत्या १ ऑगस्टपासून मेट्रोचा विस्तारित मार्ग सामान्यांसाठी खुला होणार आहे. मेट्रोच्या रखडलेल्या विस्तारित मार्गाच्या लोकार्पणाला अखेर १ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे. ते बटन दाबतील आणि अवघ्या तासाभरात वनाज ते थेट पीसीएमसी या मार्गावर मेट्रो व्यावसायिक तत्त्वावर सुरू होईल.
दर शनिवार, रविवारी तिकीट दरात महामेट्रोने सर्व प्रवाशांसाठी ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. महामेट्रोचे ऑपरेशन विभागाचे संचालक विनोदकुमार अग्रवाल व जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली. वनाज ते पीसीएमसी या मार्गाचे नियमित तिकीट ३५ रुपये असेल, शनिवार व रविवार त्यात ३० टक्के सवलत मिळेल. वनाज ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंतचे तिकीट २५ रुपये असेल व त्यातही शनिवार, रविवार तिकीट दरात ३० टक्के सवलत असेल. तिकिटे ऑलनाइन पद्धतीनेही मिळतील, तसेच त्यासाठी खास मास्टर कार्डही काढण्यात येणार आहे.
स्थानकांपर्यंत पीएमपीएमएलसह काही खासगी वाहनांची फिडर सेवा असेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या ठिकाणी येणार नाहीत. ते बहुधा पोलिस कवायत मैदानातून मेट्रोसह अन्य काही प्रकल्पांचे बटन दाबून लोकार्पण करतील. लोकमान्य टिळक पुरस्कार मोदी यांना जाहीर करण्यात आला असून, तोच त्या दिवशीचा त्यांचा मुख्य कार्यक्रम आहे. त्यांचा दौरा निश्चित झाला असला तरी कार्यक्रमांच्या वेळा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.
पालकमंत्र्यांनी केली पाहणी
प्रधानमंत्री – नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते.
मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जोडले जाणार असून पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडत असल्याने पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले. पाटील यांनी मेट्रो चालविणाऱ्या महिला चालकाशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
असा आहे मेट्रो मार्ग
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. डेक्कन, शिवाजीनगर आणि पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल सेवेबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे.
पादचारी पुलाचे काम अपूर्ण
स्वारगेट, मंडई, कसबा पेठ ही भुयारी मार्गाची तीन स्थानके वगळता मेट्रोचे जाहीर केलेले वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन्ही मार्ग पूर्णपणे तयार झाले आहेत. काही स्थानकांकडे रस्त्यावरून स्थानकात यायचे पादचारी पूल तयार होणे बाकी आहे, तसेच स्थानकांमधील काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. वनाज ते पीसीएमसी या मार्गावर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकात जमिनीखाली पिंपरी -चिंचवड ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे स्थानक आहे, त्याच्या बरोबर वरच्या बाजूस वनाज ते रामवाडी या उन्नत मार्गाचे स्थानक आहे. प्रवाशांना या स्थानकात त्यांना जिथे जायचे आहे त्या स्थानकात जावे लागेल. त्यासाठी या स्थानकात तब्बल १९ सरकते जिने आहेत.