पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन आज झाले. पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. विशेष म्हणजे मोदी यांनी त्यांच्या प्रवासाचे तिकीट स्वतःच काढले. त्यांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी केली. तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत त्यांनी मेट्रोने प्रवास केला आणि या प्रवासात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बघा व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण https://t.co/FiwWyzW7x2
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 6, 2022
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर सोमवारपासून म्हणजेच ७ मार्चपासून पुणेकरांना मेट्रोसेवा उपलब्ध होणार आहे. वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते फुगेवाडी अशा या दोन मेट्रो आहेत. या दोन्ही मेट्रो या प्रत्येकी तीन डब्यांच्या असतील. त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव असेल. प्रत्येक डब्यात ३२५ प्रवासी प्रवास करु शकतील. सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत मेट्रो सेवा उपलब्ध असेल. दर अर्ध्या तासाने मेट्रोची सेवा मिळेल. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गात एकूण ५ मेट्रो स्टेशन्स आहेत. यातील पहिल्या ३ स्टेशन्ससाठी पुणेकरांना १० रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. तर, त्यापुढील दोन स्टेशन्स गाठण्यासाठी आणखी १० रुपये मोजावे लागतील. म्हणजेच, पहिल्या ३ स्टेशन्सपर्यंत १० रुपये आणु पुढील दोन स्टेशन्ससाठी २० रुपये तिकीट आहे. पिंपरी ते फुगेवाडी हे अंतर ७ किलोमीटरचे आहे. पिंपरीहून फुगेवाडीला जाण्यासाठी २० रुपये तिकीट दर असेल.