पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले तसेच पुण्यातील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी स्वातंत्र्यलढ्यात पुण्याने दिलेल्या योगदानाची आठवण करून देताना लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट, गोपाळ कृष्ण देशमुख, आर जी भांडारकर आणि महादेव गोविंद रानडे या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. त्यांनी रामभाऊ म्हाळगी, बाबासाहेब पुरंदरे यांनाही वंदन केले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि शिवाजी महाराजांना अभिवादन केले. आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेले शिवाजी महाराज यांचा हा पुतळा तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत करेल, असे ते म्हणाले.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले,“हे माझे भाग्य आहे की तुम्ही मला पुणे मेट्रोच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले होते आणि आता तुम्ही मला त्याचे उद्घाटन करण्याची देखील संधी दिली आहे. प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकतात हा संदेशही यात आहे. मोदी पुढे म्हणाले की ,“शिक्षण, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन निर्मिती क्षेत्रातही पुण्याने सातत्याने आपली ओळख मजबूत केली आहे. अशा परिस्थितीत आधुनिक सुविधा ही पुणेकरांची गरज आहे आणि आमचे सरकार पुण्यातील लोकांची ही गरज लक्षात घेऊन काम करत आहे. 2014 पर्यंत मोजक्याच शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध होती, आज देशातील दोन डझनहून अधिक शहरे मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत किंवा काही शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होण्याचा मार्गावर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यात मुंबई, ठाणे, नागपूर आणि पिंपरी चिंचवड, पुणे या शहरांमधील मेट्रो सेवा पाहिल्यास, मेट्रो रेल्वे सेवेच्या या विस्तारात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.ही मेट्रो सेवा पुण्यातील वाहतूक / प्रवास सुलभ करेल, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीपासून दिलासा देईल त्याचप्रमाणे पुण्यातील नागरिकांच्या जगण्यातील सुलभता वाढवेल, असा विश्वास पंतप्रधान व्यक्त केला. मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक वापरण्याची सवय पुण्यातील विशेषत: सुखवस्तू नागरिकांनी अंगी बाणवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वाढती शहरी लोकसंख्या ही संधी आणि आव्हान दोन्ही आहे. आपल्या शहरांमधील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रश्नाचे, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा विकास हे मुख्य उत्तर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील वाढत्या शहरीकरणाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून , सरकार अधिकाधिक हरित वाहतूक, इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक दुचाकी त्याचप्रमाणे प्रत्येक शहरात अत्याधुनिक वाहतूक सुविधा, सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व सुविधांसाठी नागरिकांना एकच कार्ड प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे ,अशा प्रकारच्या उपक्रमांची पंतप्रधानांनी यादी सांगितली. सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रत्येक शहरात एकात्मिक कमांड आणि कंट्रोल केंद्र असावे. चक्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रत्येक शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन यंत्रणा असायला हवी.प्रत्येक शहराला अतिरिक्त पाणी मिळावे या अनुषंगाने पुरेसे आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असावेत तसेच जलस्रोतांच्या संवर्धनासाठी चांगली व्यवस्था केली पाहिजे, या गरजांवर पंतप्रधानांनी भर दिला. कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी अशा शहरांमध्ये गोबरधन आणि बायोगॅस प्रकल्प असावेत , एलईडी बल्बचा वापर यांसारखे ऊर्जा कार्यक्षम उपाय हे या शहरांचे वैशिष्ट्य असले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अमृत अभियान आणि रेरा कायदे ,शहरी परिदृश्यामध्ये नवीन सामर्थ्य आणत आहेत, असे ते म्हणाले.
A boost to urban infra Pune. Watch. https://t.co/9X3mvgEpYm
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
शहरांच्या जीवनात नद्यांच्या महत्त्वाचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला आणि आणि नद्या असलेल्या अशा शहरांमध्ये या महत्त्वाच्या जीवनवाहिन्यांचे महत्त्व अधोरेखित करून आणि त्यांचे जतन करण्यासंदर्भात नवी जागरूकता निर्माण करण्यासाठी नदी महोत्सव आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. देशात पायाभूत सुविधाप्रणीत विकासाच्या नव्या दृष्टिकोनाकडे लक्ष वेधताना पंतप्रधान म्हणाले,” कोणत्याही देशात आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेग आणि व्याप्ती . परंतु अनेक दशकांपासून आपल्याकडे अशा यंत्रणा होत्या ज्यामुळे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच कालावधी लागत असे. या सुस्त वृत्तीचा देशाच्या विकासावरही परिणाम झाला.” पंतप्रधान पुढे म्हणाले, “आजच्या गतिशील भारतात, आपल्याला वेग आणि व्याप्ती यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. म्हणूनच आमच्या सरकारने पंतप्रधान -गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यांनी सांगितले की, गतिशक्ती योजना एकात्मिक केंद्राविंदू सुनिश्चित करेल ज्यात सर्व संबंधित हित धारक संपूर्ण माहिती घेऊन आणि योग्य समन्वयाने कार्य करतील. आधुनिकतेबरोबरच पुण्याची प्राचीन परंपरा आणि महाराष्ट्राची शान यांनाही शहरी नियोजनात समान स्थान दिले जात असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प हा पुण्यातील नागरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्याच हस्ते करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांबी मार्गाचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झाले. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधला जात आहे. पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकावरील प्रदर्शनाचे उद्घाटन व पाहणी केली आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास केला.
पुणे शहरातील मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारण प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली. नदीच्या 9 किमी लांबीच्या पट्ट्याचे 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाणार आहे. यामध्ये नदीकाठा चे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश आहे . मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जाणार आहेत, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 दसलक्ष घनलिटर असेल. बाणेर येथे 100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही पंतप्रधान लोकार्पण करण्यात आले. याशिवाय पंतप्रधानानी यावेळी पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आर के लक्ष्मण आर्ट गॅलरी अर्थात कला संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केले . या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहेत. पंतप्रधानानी तत्पूर्वी आज सकाळी सर्वप्रथम पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले.सुमारे 9.5 फूट उंची असलेला हा पुतळा बनवण्यासाठी 1850 किलोग्रॅम गन मेटलचा वापर केला आहे.