इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमामध्ये तामिळनाडूतील एका बचत गटाचे तोंडभरुन कौतुक केले. त्यामुळे या बचत गटाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. मोदी नक्की का म्हणाले आणि हे बचत गट काय काम करते हे जाणून घेऊया.
पंतप्रधान मोदी हे मन की बात कार्यक्रमात म्हणाले की,
मित्रहो,
काही दिवसांपूर्वी मला एक मनोरंजक आणि आकर्षक गोष्ट मिळाली, ज्यामध्ये देशवासीयांची सर्जनशीलता आणि कलात्मक प्रतिभा एकवटलेली आहे. तमिळनाडू येथील तंजावर मधल्या एका स्वयंसहायता गटाने ती भेट मला पाठवली आहे. या भेटीत भारतीयत्वाचा सुगंध आहे आणि मातृशक्तीचा आशीर्वाद आहे, माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना आहे. ही भेट म्हणजे तंजावरची एक खास बाहुली आहे, जिला भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग देखील मिळाला आहे. स्थानिक संस्कृतीशी नाळ जपणारी ही भेट मला पाठवल्याबद्दल मी तंजावरच्या स्वयं-सहायता गटाचे विशेष आभार मानतो.
खरे तर मित्रहो, तंजावरची ही बाहुली सुंदर आहे आणि आपल्या या सौंदर्यासह ती स्त्री सक्षमीकरणाची नवी गाथाही लिहित आहे. तंजावरमध्ये महिला स्वयं-सहायता गटांची दुकाने आणि केंद्रेही सुरू होत आहेत. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे जीवनमान बदलले आहे. अशा केंद्रांच्या आणि स्टोअर्सच्या मदतीने महिला आता थेट ग्राहकांना आपली उत्पादने विकू शकतील.
या उपक्रमाला ‘थरगाईगल कैविनाई पोरुत्तकल वीरप्पानई अंगडी’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 22 स्वयं-सहायता गट या उपक्रमाशी संलग्न आहेत. महिला स्वयं-सहायता गट तसेच महिला बचत गटांची ही दुकाने तंजावरमध्ये अतिशय मोक्याच्या जागी उघडली आहेत, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. या दुकानांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारीही महिला घेत आहेत.
महिलांचे हे बचत गट तंजावर बाहुली आणि कांस्याचे दिवे अशा जीआय उत्पादनांशिवाय खेळणी, चटई आणि कृत्रिम दागिने सुद्धा तयार करतात. अशा दुकानांमुळे जीआय उत्पादनांच्या तसेच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या मोहिमेमुळे केवळ कारागिरांनाच चालना मिळाली नाही, तर महिलांचे उत्पन्न वाढून त्यांचे सक्षमीकरणही होत आहे.
‘मन की बात’च्या श्रोत्यांनाही माझी एक विनंती आहे. तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा. असे केल्यानेतुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणार नाही तर त्यायोगे’आत्मनिर्भर भारत मोहिमेला’ चालनाही मिळेल.