नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिलं स्थान मिळालं आहे. अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी ‘मॉर्निग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
मॉर्निंग कन्सल्ट हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, निवडणूक, राजकारणी आणि सध्याच्या विषयांवर रिअल-टाइम डेटा त्यांच्याकडून पुरवला जातो. मॉर्निंग कन्सल्टकडून दर आठवड्याला हा डेटा जाहीर केला जातो. या डेटासाठी ते सुमारे २० हजार ऑनलाइन मुलाखती घेतात. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हे अप्रूव्हल रेटिंग १७ ते २३ ऑगस्ट मधील डेटाच्या आधारे काढण्यात आलेलं आहे. प्रत्येक देशात सर्वेमध्ये सहभागी लोकांची संख्या वेगळी आहे. या सर्वेत ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करुन घेण्यात येतं. सर्व मुलाखती ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात असून, भारतामधील सर्वेत सुशिक्षित लोकांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्यूअल लोपेज ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे. ओब्राडोर यांना ६३ टक्के रेटिंग असून, मारियो यांची रेटिंग ५४ टक्के आहेत. या यादीत जगभरातील एकूण २२ नेते आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना यादीमध्ये ४१ टक्के रेटिंगसह पाचवं स्थान मिळालं आहे. बायडन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ३९ टक्के रेटिंग आहे. तर सातव्या क्रमांकावर ३८ टक्के रेटिंगसह जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये यादीत पहिलं स्थान मिळवलं होतं.
PM Narendra Modi Popularity World Ranking Rating
Popular Personality World Leaders Survey Report