नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी युपीआय पेमेंट विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. कोरोनाच्या काळात ऑनलाईन पैसे देणे आणि घेणे याला महत्व प्राप्त झाले. भारत सरकारने याविषयी कसे प्रयत्न केले आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात त्यामुळे कसा आणि किती बदल झाला आहे, हे सुद्धा स्पष्ट केले. यावेळी दोन किस्सेही त्यांनी श्रोत्यांना सांगितले.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की,
मित्रहो, कल्पना करा की एखादी व्यक्ती, आपण दिवसभर संपूर्ण शहरात फिरू आणि एकाही पैशाचा व्यवहार रोखीने करणार नाही, असा संकल्प करून आपल्या घरातून बाहेर पडेल. किती वेगळा संकल्प आहे ना हा? सागरिका आणि प्रेक्षा या दिल्लीतल्या दोन मुलींनी असाच कॅशलेस डे आऊटचा प्रयोग केला. सागरिका आणि प्रेक्षा दिल्लीत जिथे जिथे गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळाली. UPI QR कोडमुळे त्यांना पैसे काढण्याची गरजच भासली नाही. अगदी रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आणि फिरत्या विक्रेत्यांकडेही त्यांनी ऑनलाइन व्यवहार सहज करता आले.
मित्रहो, एखाद्याला वाटेल की दिल्ली हे महानगर आहे, तिथे हे अगदी सहज शक्य आहे. पण आता UPI चा वापर फक्त दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित असावा, अशी परिस्थिती नाही. गाझियाबादहून आनंदिता त्रिपाठी यांचाही एक संदेश मला मिळाला आहे. आनंदिता गेल्याच आठवड्यात आपल्या पतीसोबत ईशान्य भागात गेल्या होत्या. आसाम ते मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग पर्यंतच्या आपल्या प्रवासाचा अनुभव त्यांनी मला सांगितला. कित्येक दिवसांच्या या प्रवासात त्यांना अगदी दुर्गम भागातही पैसे देण्याची गरज भासली नाही, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इंटरनेटचीही चांगली सुविधा नव्हती, तिथे आता UPI द्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. सागरिका, प्रेक्षा आणि आनंदिता यांचे अनुभव पाहता, मी तुम्हालाही कॅशलेस डे आऊटचा प्रयोग करून पाहण्याची विनंती करेन, तुम्ही हे नक्की करून बघा.
मित्रहो, गेल्या काही वर्षात भीम UPI हा अगदी झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतेक गावांमध्येही लोक UPI च्या माध्यमातूनच व्यवहार करत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे. गल्लीबोळातल्या छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे सोपे झाले आहे. आता त्यांना सुट्ट्या पैशाचीही समस्या राहिली नाही. रोजच्या जगण्यात तुम्हाला सुद्धा UPI ची सोय जाणवली असेल. कुठेही जा, रोख पैसे बाळगण्याचा, त्यासाठी बँकेत जाण्याचा, एटीएम शोधण्याचा त्रास संपला आहे.
मोबाईलवरूनच सगळे व्यवहार केले जातात.परंतु या लहान-सहान ऑनलाईन पेमेंटमुळे देशात किती मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आजघडीला आपल्या देशात दररोज सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. गेल्या मार्च महिन्यात तर यूपीआयच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार झाले. यामुळे देशात सुविधा वाढत असून, प्रामाणिकपणाचे वातावरणही निर्माण होते आहे. आता फिन-टेकशी संबंधित अनेक नवीन स्टार्टअप्सही देशात पुढे येत आहेत. डिजिटल पेमेंट आणि स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या या सामर्थ्याशी संबंधित काही अनुभव तुमच्याकडे असल्यास ते आमच्यापर्यंत पोहोचवा, असे मी सांगू इच्छितो. तुमचे अनुभव इतर अनेक देशवासीयांसाठी प्रेरक ठरू शकतात.