इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशात झालेल्या अतिशय गंभीर आणि मोठ्या रेल्वे अपघातस्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी भेट दिली. हा अपघात तीन रेल्वे गाड्यांचा होता. त्यात तब्बल २८८ प्रवाशांचा बळी गेला आहे. तर, ८०० जण जखमी आहेत. मोदी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि या अपघाताविषयी सविस्तर माहिती घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर रेल्वे अपघातस्थळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अपघातातील जखमींची भेट घेण्यासाठी बालासोर येथील रुग्णालयात पोहोचले. येथे त्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची प्रकृती जाणून घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावरून कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास सांगितले. तसेच शोकग्रस्त कुटुंबीयांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी आणि बाधितांना आवश्यक ती मदत मिळावी, असेही ते म्हणाले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्यासाठी हे खूप दुःखदायक आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्या आरोग्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ही एक गंभीर घटना आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. यावेळी त्यांनी रेल्वे, ओडिशा सरकार आणि स्थानिक लोकांचे उपलब्ध साधनांसह बचाव कार्य चालवल्याबद्दल आभार मानले. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे ते म्हणाले. या दुःखाच्या वेळी आपण सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून आपण त्यावर मात करू शकू. आम्ही मृतांच्या कुटुंबियांसोबत आहोत.
PM Narendra Modi on Railway Accident Spot Visit