इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे, जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस आहे. आणि गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्येच झाला आहे. बौद्ध पौर्णिमेच्याच दिवशी मोदी हे नेपाळ आणि बुद्ध जन्मस्थानाला भेट देत आहेत. मात्र, मोदींनी आजचाच दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये जेव्हा शेर बहादूर देउबा यांनी नेपाळची कमान हाती घेतली, तेव्हापासूनच त्यांच्या काळात भारताशी मैत्री वाढेल असा अंदाज बांधला जात होता. त्यांच्या आधी पंतप्रधान असलेले केपी शर्मा ओली हे चीनचे जवळचे मानले जात होते, तर देउबा सर्व देशांशी समान संबंध ठेवण्याच्या बाजूने आहेत. याशिवाय त्यांनी भारताशीही जवळीक साधली आहे. वर्षभरापूर्वी चांगल्या संबंधांसाठी लावलेली अटकळ आता खरी ठरत आहे आणि यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बौद्ध पौर्णिमेनिमित्त ते आज नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते महात्मा बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी येथे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची भेट घेत आहेत. तत्पूर्वी ते कुशीनगर येथे पोहोचले, तेथे त्यांनी महात्मा बुद्धांच्या महापरिनिर्वाण स्थळावर आदरांजली वाहिली.
एक महत्त्वाचा प्रश्न असाही आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ भेटीसाठी बौद्ध पौर्णिमेचा दिवस का निवडला? किंबहुना, प्रतिकांच्या माध्यमातून मोठा संदेश देण्यात माहिर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा बुद्ध हा नेपाळ आणि भारताचा समान वारसा कसा आहे हे माहीत आहे. नेपाळ हा शेजारी देश आहे तसेच भारताचा सांस्कृतिक भागीदार आहे आणि खूप जवळचा आहे. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या सरकारांच्या काळात नेपाळची चीनशी जवळीक वाढली असली तरी भारताचा प्रभाव अजूनही त्यावर कायम आहे. हा प्रभाव कायम ठेवण्यासाठी आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ही संधी निवडली आहे. बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला, त्यांचे ज्ञानस्थान बिहारमधील गया हे होते आणि त्यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे निर्वाण प्राप्त केले.
याशिवाय, मगध साम्राज्याच्या काळात बौद्ध धर्माचा जगात प्रसार झाला आणि सम्राट अशोकाने बौद्ध भिक्षूंना श्रीलंकेपासून पूर्व आशियापर्यंतच्या देशांमध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी पाठवले. या प्राचीन वारशाच्या माध्यमातून भारत आणि नेपाळ सध्याच्या जागतिक राजकारणात जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. बुद्ध सर्किटसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही पीएम मोदींनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उद्घाटन केले होते. भारत सरकारने बुद्ध सर्किट विकसित करण्याचे काम सुरू केले असून या विमानतळाच्या माध्यमातून जगभरातील लोकांना महात्मा बुद्धांच्या स्थळांपर्यंत नेपाळपासून भारतापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.