इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी त्यांची आई हीराबेन मोदी यांच्या १००व्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदींची आई गुजरातमधील गांधीनगरमध्ये राहते. वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ११ मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये त्यांच्या आईची भेट घेतली होती. त्यानंतर ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांची आई हीराबेन मोदी यांच्यात सुमारे दोन वर्षांनी भेट झाली होती. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, १८ जून रोजी पीएम मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वडोदरातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुमारे ४ लाख लोकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम सरदार इस्टेटजवळील कुष्ठरोग रुग्णालयात होणार आहे.
महिनाभरातील दुसरा गुजरात दौरा
एका महिन्यात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा गुजरात दौरा असेल. १० जून रोजी आपल्या पहिल्या भेटीदरम्यान, मोदींनी नवसारीच्या आदिवासी भागात ३ हजार ०५० कोटी रुपयांच्या ७ प्रकल्पांचे उदघाटन केले. याशिवाय पाणीपुरवठा सुधारण्याच्या उद्देशाने इतर १४हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. १८ जून रोजी होणाऱ्या पीएम मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
जर्मन तंत्रज्ञान खास घुमट
दौऱ्याविषयी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कार्यक्रमस्थळी जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेल्या विशेष घुमटांसह काही विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. रस्त्यांचे कार्पेटिंग, पार्किंग सुविधा, दिवाबत्ती आणि अनुषंगिक सुविधांचे कामही पूर्णत्वास आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय पथकेही घटनास्थळी तैनात असतील. या वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी निवडणुकीपूर्वी जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवत असल्याचे बोलले जात आहे.