इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात जपानचा दौरा केला. क्वाड देशांच्या बैठकीसाठी ते तेथे गेले होते. तेथे काय वेगळे अनुभव आले यासंदर्भात मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात माहिती दिली. यावेळी त्यांनी जपानमधील काही महत्त्वाचे किस्से सांगितले. हे किस्से ऐकून श्रोत्यांनाही आनंद झाला.
पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये म्हणाले की,
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वी मी जपानला गेलो होतो. माझ्या अनेक कार्यक्रमांमुळे मला काही महान व्यक्तिमत्त्वांना भेटण्याची संधी मिळाली. त्याच्याविषयी ‘मन की बात’मध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. आहेत तर ते जपानी लोक, पण त्यांना भारताविषयी कमालीची ओढ आणि प्रेम आहे. यापैकी एक म्हणजे हिरोशी कोइके जी, जे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की त्यांनीच महाभारत प्रोजेक्ट दिग्दर्शित केलेला आहे. ह्या प्रकल्पाची सुरुवात कंबोडियामध्ये करण्यात आली आणि गेल्या 9 वर्षांपासून तो अविरत सुरू आहे.
हिरोशी कोइके अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे सर्व करतात. ते दरवर्षी आशिया खंडातील एका देशात जातात आणि तेथील स्थानिक कलाकार आणि संगीतकारांच्या साथीने महाभारतातील काही भाग तयार करतात. या प्रकल्पाद्वारे त्यांनी भारत, कंबोडिया आणि इंडोनेशियासह नऊ देशांमध्ये कार्यक्रमांची निर्मिती देखील केली आहे आणि रंगमंचावर कार्यक्रम देखील सादर केले आहेत.
हिरोशी कोइके जी शास्त्रीय आणि पारंपारिक आशियाई कला सादरीकरण करणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना एकत्र आणतात . त्यामुळे त्याच्या कामात विविध रंग छटा पाहायला मिळतात. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि जपानमधील कलाकार जावा नृत्य, बालीनीज नृत्य, थाई नृत्याच्या माध्यमातून ते अधिक आकर्षक बनवतात. विशेष म्हणजे यातील प्रत्येक कलाकार आपापल्या मातृभाषेत बोलतो आणि नृत्य दिग्दर्शन देखील अतिशय सुंदरतेने हे वैविध्य दाखवते आणि संगीतातील विविधता तर ही निर्मिती अधिकच जिवंत करते. आपल्या समाजात विविधता आणि सह-अस्तित्वाचे किती महत्त्व आहे, शांतीचे वास्तविक स्वरूप नेमके कसे असावे, हे सर्वाना दाखवावे हा त्यांचा उद्देश आहे.
याशिवाय, मी जपानमध्ये ज्या दोन इतर लोकांना भेटलो ते म्हणजे आत्सुशी मात्सुओ-जी आणि केंजी योशी-जी. हे दोघेही टीईएम प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित आहेत. ही कंपनी रामायणाच्या 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या जपानी ऍनिमेशन फिल्मशी संबंधित आहे. हा प्रकल्प जपानमधील अतिशय प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक युगो साकोशी ह्यांच्याशी संबंधित होता.
सुमारे 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा रामायणाची माहिती मिळाली. ‘रामायण’ त्यांच्या हृदयाला भिडले, त्यानंतर त्यांनी त्यावर अधिक बारकाईने संशोधन सुरू केले. इतकेच नाही तर त्यांनी रामायणाच्या जपानी भाषेतील 10 वेगवेगळ्या आवृत्त्या वाचल्या आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांना रामायणाचे ऍनिमेशन देखील करायचे होते. यामध्ये भारतीय ऍनिमेटर्सनीही त्यांना खूप मदत केली. त्यांना चित्रपटात दाखवलेल्या भारतीय चालीरीती आणि परंपरांबद्दल मार्गदर्शन केले.
त्यांना भारतातील लोक धोतर कसे नेसतात, साडी कशी नेसतात, केशरचना कशी करतात हे सांगण्यात आले. कुटुंबात मुले सर्वांचा, एकमेकांचा आदर कसा करतात, आशीर्वादाची परंपरा काय असते? सकाळी उठणे, आपल्या घरातील ज्येष्ठांना नमस्कार करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे या सर्व गोष्टी. आता 30 वर्षांनंतर हा ऍनिमेशन चित्रपट 4K मध्ये रुपांतरीत होत आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर, जपानमध्ये बसलेले लोक, ज्यांना ना आपली भाषा येते , ना आपल्या परंपरांविषयी जास्त माहिती आहे, त्यांचे आपल्या संस्कृतीबद्दलचे समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय आहे. कोणत्या भारतीयाला ह्याचा अभिमान वाटणार नाही?