इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके वाचण्याची गरज नाही. फक्त एका क्लिकवर त्यांच्या जीवनातील ठाऊक नसलेले पैलू तुम्हाला समजून घेता येणार आहेत. स्वयंसेवकांच्या पुढकाराने मोदी स्टोरी नावाचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर पंतप्रधानांच्या जवळच्या व्यक्तींच्या अनुभवांचे संकलन करण्यात आले आहे.
प्रेट्र या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नात सुमित्रा गांधी कुलकर्णी यांनी शनिवारी या संकेतस्थळाचे अनावरण केले. पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित वैयक्तिक आठवणी, लिहिलेल्या गोष्टी, ऑडिओ किंवा व्हिडिओच्या स्वरूपात किस्से-गोष्टी, छायाचित्रे किंवा पत्रे संकेतस्थळाला शेअर करण्याचे आवाहन संकेतस्थळाच्या संबंधितांनी केले आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर या संकेस्थळाचा (मोदीस्टोरी.इन) अॅड्रेस शेअर केला आहे. ट्विटमध्ये स्मृती इराणी लिहितात, “संयम आणि कृपेच्या गोष्टी, वैयक्तिक भेटीच्या जादूच्या आठवणी, एक मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व, एका निर्णायक राजकीय व्यक्तिमत्वाचे चित्रण करणारे संभाषण, आतापर्यंत न सांगितलेल्या, न ऐकलेल्या गोष्टी”.
गुजरातमध्ये राहणाऱ्या डॉ. अनिल रावल यांनी १९८० च्या दरम्यान मोदींनी त्यांच्यासोबत काढलेल्या यात्रेदरम्यान ऐकवलेल्या हृदयविदारक गोष्टी शेअर केल्या आहेत. डॉ. रावल यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारले होते, की “शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी तुम्ही किती बांधील आहात”? त्यावर त्यांना एका स्वयंसेवकाच्या घरी गेल्याची आणि तेथे जेवण केल्याची एक घटना आठवली. पंतप्रधानांचा हवाला देत डॉ. रावल म्हणाले, “की स्वयंसेवक पत्नी आणि मुलासोबत एका झोपडीत राहात होते. एका ताटात त्यांनी मला बाजरीची अर्धी भाकरी आणि लहान वाटीत दूध वाढले. त्यांचा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता आणि त्याचे लक्ष माझ्या ताटातील वाटीवर होते. मी पाण्यासोबत अर्धी भाकरी खाल्ली आणि ते दूध मुलाला दिले. आईने मुलाला दुधाची वाटी दिली. मुलाने एका क्षणात ते दूध पिऊन टाकले. माझ्या डोळ्यात पाणी आले. तेव्हाच मी शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला”.
अशाच प्रकारे गुजरातमध्ये राहणाऱ्या रोहित अग्रवाल यांनी सांगितले, की आणीबाणीदरम्यान मोदी यांनी कशाप्रकारे सरदारजींचा (शीख) वेष धारण केला होता आणि पोलिसांच्या तावडीत येण्यापासून स्वतःला वाचवले होते.
पंजाबमध्ये राहणारे भाजपचे नेते मनोरंजन कालिया सांगतात, “निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलांसाठी टॉफी घेऊन जाण्याचा सल्ला मोदी देत होते. मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला पंजाबमध्ये अनेक वर्षे काम केले होते”. याच प्रकारे अगदी शाळेच्या मुख्याध्यापकापासून ते ऑलिम्पिक विजेत्यांपर्यंत सर्वांचे अनुभव संकलित करण्यात आले आहेत.