इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाच वर्षांनी सरकार बदलतात, त्यामुळे विकासावर परिणाम होतो. संतुलित विकासासाठी स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. डबल इंजिन असलेल्या सरकारमुळे विकासाला गती मिळते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत रोड शो केला. तसेच येथील वकील, प्राध्यापक, डॉक्टर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बुद्धिवंतांशी संवाद साधला. राज्यात असे सरकार आवश्यक आहे, जे सांस्कृतिक वारशाचे जतन करत विकास पुढे नेईल. गेल्या पाच वर्षांत जी विकासकामे झाली आहेत, ती पुढेही कायम सुरू राहावीत यावर विचार करणे गरजेचे आहे. यादरम्यान पायाभरणी कार्यक्रम झालेल्या विकासकामांचे लोकार्पण वेळेत व्हावेत यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, अशी साद पंतप्रधान मोदी यांनी घातली. पंतप्रधान म्हणाले, गुजरातमध्ये दीर्घकाळ एकाच पक्षाच्या सरकारने काम केले आहे. त्यामुळे तिथे चांगली विकासकामे झाली आहेत. आगामी पाच वर्षांत उत्तर प्रदेशला आर्थिक हब बनवायचे आहे. हे काम वाराणसीच्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मी वाराणसीच्या नागरिकांच्या इतक्या जवळ आहे, की त्यांनी काही सांगितल्याविना मला समजते. नागरिकांनी जे प्रेम मला दिले त्यासाठी त्यांचा आभारी आहे.
पंतप्रधान म्हणाले, की मी निवडणूक जिंकल्यानंतर गंगा आरतीदरम्यान धन्यवाद देण्यासाठी आलो होतो. तेव्हा मी एक चूक केली. ही चूक कोणताच राजकीय नेता करत नाही. मी म्हणालो होतो की, काशीवासीयांकडे काहीतरी मागण्यासाठी आलो आहे. काशीमधील सर्व नागरिक स्वच्छतेचे काम करतात. हा संदेश पूर्ण जगात जातो. काशीमधील परिवर्तन जन, मनातून आहे. काशीनेच मला जन-गण-मन शिकवले आहे. तीस वर्षांपर्यंत देशात स्थिर सरकार स्थापन झाले नव्हते. रेल्वेमध्ये तीस वर्षांत कोणताही निर्णय झाला नव्हता. पूर्ण बहुमत मिळालेले सरकार देशासाठी अनिवार्य आहे. स्थिर सरकारसाठी उत्तरदायीत्व असते. पंतप्रधान म्हणाले, की काशी विश्वनाथ धाम खूप आधीच तयार व्हायला पाहिजे होते. हा काशीचा हक्क आहे. हे काम आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने केलेले नाही. काशीसाठी मी वेगळ्या निधीची तरतूदही केलेली नाही. हे काम काशीमधील नागरिकांच्या सहकार्याने पार पडले आहे. फिडबॅक घेण्यावर माझा स्वतःचा विश्वास आहे. मी काल रात्री स्थानकातील लाउंजमध्ये गेलो आणि सर्व व्यवस्था पाहिली आहे. तिथे पाच फुटाच्या जागेत काशीमध्ये बनवलेले खेळणे आणि हस्तशिल्पाच्या वस्तू होत्या. विचारले तर असे कळाले की, तेथे दररोज दहा हजार रुपयांचा व्यवसाय होतो. काशीच्या गरीब जनतेच्या पोटा-पाण्याची सोय रेल्वेच्या या छोट्या जागेत होते.