नवी दिल्ली – भाजप खासदारांना सरकार आणि पक्षाची कामे तसेच जनतेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत नाश्ता करताना बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्ये खेळ, योग, सामाजिक आणि अध्यात्मिक क्रियाकलाप करण्याचा समावेश आहे. खासदारांनी स्वतःची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्याचा संदेश या बैठकांमधून देण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी नेहमीच संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदारांशी संवाद साधत आले आहेत. कोरोना काळात या क्रियेत खंड पडला होता. परंतु आता ते पुन्हा खासदारांशी संवाद साधत आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी दक्षिण भारतातील खासदारांसोबत नाश्ता करताना बैठक घेतली होती. आता ते उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या खासदारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकांमध्ये पंतप्रधान खासदारांच्या कामाची माहिती घेत आहेत. तसेच पक्ष आणि सरकारी कामांशिवाय आणखी काय करतात हेसुद्धा विचारले जात आहे. पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीत खासदारांना जनतेमध्ये क्रीडा स्पर्धा घेणे, योग कार्यक्रम घेणे, सूर्यनमस्कारसारखे कार्यक्रम आयोजित करण्यासह सामाजिक कार्यात सहभाग घेण्याचा सल्ला दिला होता. पक्ष आणि विचारधारा जनतेमध्ये बळकट करून खासदारांनी स्वतःची वेगळ्या नेतृत्वाची प्रतिमा निर्माण करण्याचा संदेशही ते अप्रत्यक्षरित्या देत आहेत.
अशा बैठकांमध्ये खासदार आपल्या लोकसभा मतदारक्षेत्रातील विकासकामांबाबत माहिती देतात. तसेच पक्षाच्या कार्यक्रमांबद्दल माहिती देत असतात. परंतु पंतप्रधान याच्या पुढील माहिती जाणून घेत आहेत. त्यामध्ये बहुतांश खासदारांकडे विशेष काही सांगण्यासारखे नसते. त्यामुळेच खासदारांनी आपले संसदीय दायित्व आणि पक्षाच्या कामांशिवाय वेगळे होऊन सामाजिक जीवनाशी एकरूप होण्यास सांगण्यात येत आहे.
पक्षात खासदारांच्या लोकप्रियतेबाबत चर्चा सुरू असते. स्वतः पंतप्रधान वेळोवेळी खासदारांना इशारा देत असतात. लोकसभा निवडणुकीसाठी अजून अडीच वर्षे बाकी आहेत. म्हणजेच निम्मा कार्यकाल बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधानांना आपल्या खासदारांनी आपापल्या क्षेत्रात पूर्णपणे बळकट व्हावे अशी इच्छा आहे.