इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इजिप्त दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. भारतीय बोहरा दाऊदी समुदायाच्या मदतीने नूतनीकरण केलेल्या ११व्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला पंतप्रधान मोदी आज भेट देणार आहेत. यानंतर ते पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या ३७९९ भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीलाही भेट देतील.
याशिवाय पंतप्रधान मोदी आज राजधानी कैरोमध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांनी शनिवारी ट्विट केले की, या भेटीमुळे इजिप्तसोबतचे संबंध दृढ होतील. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या भेटीसाठी उत्सुक आहोत. भारत आणि इजिप्तमधील संबंध प्राचीन व्यापारी आणि आर्थिक संबंधांवर तसेच सांस्कृतिक आणि खोलवर रुजलेल्या लोक-लोकांच्या संबंधांवर आधारित आहेत. जानेवारी २०२३ मध्ये राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या राज्य भेटीदरम्यान या संबंधांना ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’मध्ये वाढ करण्यावर सहमती झाली होती. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला भेट देत आहेत. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला ‘मुख्य पाहुणे’ म्हणून उपस्थित राहून हे आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे.
शोले चित्रपटाच्या गाण्याने स्वागत
तत्पूर्वी, शनिवारी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी कैरोमधील रिट्झ कार्लटन हॉटेलच्या बाहेर मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक जमले होते. लोकांनी हातात तिरंगा घेतला होता. त्यांनी वंदे मातरम, मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. यादरम्यान जेना नावाच्या मुलीने शोले चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणे पीएम मोदींसमोर गायले. पंतप्रधानांनी विचारले की ती कधी भारतात गेली होती का, जिथून तिने हिंदी शिकली. जेना म्हणाली, भारतीय चित्रपट आणि गाणी ऐकून हिंदी शिकले.