नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी दीपावलीच्या पूर्वसंध्येला २३ ऑक्टोबर रोजी अयोध्येला भेट देणार आहेत. संध्याकाळी पाचच्या सुमाराला पंतप्रधान, भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर ते श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची पाहणी करतील. सायंकाळी पावणेसहा वाजता ते भगवान श्रीरामाचा प्रतिकात्मक राज्याभिषेक करतील. संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला पंतप्रधान, सरयू नदीच्या किनारी नवीन घाटावर आयोजित आरतीमध्ये सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ होईल.
दीपोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. पंतप्रधान पहिल्यांदाच या उत्सवात व्यक्तिश: सहभागी होणार आहेत. या उत्सवात १५ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. दीपोत्सवादरम्यान विविध राज्यांतील विविध नृत्यप्रकारांबरोबरच पाच अॅनिमेटेड चित्ररथ आणि रामलीलेवर आधारित अकरा चित्ररथही प्रदर्शित केले जाणार आहेत. सरयू नदीच्या किनारी राम की पायडी येथे आयोजित भव्य म्युझिकल लेझर शो बरोबरच थ्री-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो ला सुद्धा पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.
PM Narendra Modi Diwali Ayodhya Visit